GT vs RR, Qualifier 2 | सूर्यवंशीचे एकच लक्ष्य... प्रत्येक चेंडू सीमापार!

राजस्थान रॉयल्स-गुजरात टायटन्स यांच्यात दुसरी क्वॉलिफायर आज
GT vs RR, Qualifier 2 |
GT vs RR, Qualifier 2 | सूर्यवंशीचे एकच लक्ष्य... प्रत्येक चेंडू सीमापार!
Published on
Updated on

मुलानपूर; वृत्तसंस्था : आयपीएल क्वॉलिफायर-2 च्या हाय व्होल्टेज सामन्यात आज (शुक्रवार, दि. 29) राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स हे दोन दिग्गज संघ आमने-सामने भिडतील, त्यावेळी सारा फोकस राजस्थानचा वंडरकिड, 15 वर्षीय अफलातून फलंदाज वैभव सूर्यवंशीवरच असणार आहेत. वैभव सूर्यवंशीचा धडाकेबाज फॉर्म पाहता गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची रणनीती काय असेल, यावरच या लढतीतील यशापयश अवलंबून असेल. या लढतीला सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार आहे.

वैभव सूर्यवंशीचा बहारदार, कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्म ही राजस्थान रॉयल्सची जमेची बाजू असेल तर दुसरीकडे, अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी गुजरातच्या फॉर्मात असलेल्या आघाडीच्या फलंदाजांनाही सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

राजस्थानची ताकद आणि उणिवा

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला राजस्थानचा संघ प्रामुख्याने वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर या दोन ‌‘एक्स फॅक्टर‌’ खेळाडूंवर अवलंबून आहे. या दोघांनीच हैदराबादविरुद्धचा सामना फिरवला होता. सूर्यवंशीच्या झंझावातापुढे यशस्वी जैस्वालची कामगिरी फिकी पडली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ध्रुव ज्युरेलने चांगली फलंदाजी केली असली, तरी त्याला सूर्यवंशीने मिळवून दिलेल्या धडाकेबाज सुरुवातीचा फायदा मिळाला आहे. राजस्थानचा कर्णधार रियान परागने मान्य केले की, बुधवारी आमच्या संघाने 260 धावांचा टप्पा गाठायला हवा होता; परंतु शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी गडगडली. या समस्येवर मात करत डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करण्याचे राजस्थानचे लक्ष्य असेल.

गुजरातची गोलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी ताकद राहिली आहे; परंतु धर्मशाळा येथील सामन्यात आरसीबीच्या रजत पाटीदारने त्यांची गोलंदाजी फोडून काढली होती. याशिवाय गुजरातला आपल्या क्षेत्ररक्षणातही मोठी सुधारणा करावी लागेल. मधली फळी फारशी फॉर्मात नसली तरी मागच्या सामन्यात राहुल तेवतियाने केलेल्या धावा हा गुजरातसाठी एकमेव सकारात्मक दुवा आहे.

गिलचा पलटवार करण्याचा निर्धार

गुजरातच्या गोलंदाजांनी स्पर्धेच्या सुरुवातीसारखी कामगिरी केली, तर रविवारच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ते प्रबळ दावेदार असतील. कर्णधार शुभमन गिलने बाद फेरीच्या या सामन्यापूर्वी म्हटले की, क्वालिफायर-1 मधील पराभव हा एक वाईट अनुभव होता. तो विसरून येथे नव्या जोशात मैदानात उतरायचे आहे.

गुजरातचे कमबॅकवर लक्ष

‘क्वालिफायर 1‌’ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर गुजरात टायटन्सला फायनलमध्ये पोहोचण्याची ही दुसरी आणि शेवटची संधी आहे. गुजरातची भिस्त शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर या टॉप-थ्री फलंदाजांवर आहे. आरसीबीविरुद्ध जशा 250 हून अधिक धावा मोजाव्या लागल्या, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास गिल आणि सुदर्शनवर दबाव वाढू शकतो; याचे कारण म्हणजे हे दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळण्यापेक्षा डाव सावरण्यात वाक्‌‍बगार आहेत.

सारा फोकस ‌‘वंडरकिड‌’ सूर्यवंशीवरच!

15 वर्षांच्या सूर्यवंशीने यापूर्वी ‌‘एलिमिनेटर‌’ सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 29 चेंडूंत 97 धावांची खेळी करून नवे वादळ निर्माण केले. मुलानपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. त्यामुळे पॅट कमिन्ससारख्या दिग्गज गोलंदाजाची धुलाई करणाऱ्या सूर्यवंशीचा प्रयत्न येथेही प्रत्येक चेंडू सीमापार धाडण्याचाच असेल, हे स्पष्ट आहे.

उसळत्या गोलंदाजीची रणनीती सफल होणार का?

वैभव सूर्यवंशी शॉर्ट बॉल खेळताना अनेकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आहे. दोन्ही संघांमधील मागच्या लढतीत मोहम्मद सिराजने सूर्यवंशीला एक षटकार खाल्ल्यानंतर शॉर्ट बॉलवर बाद केले होते. त्यामुळे गुजरातचे गोलंदाज याच कमकुवत दुव्यावर अचूक मारा करण्याची शक्यता आहे. त्याला वैभव सूर्यवंशी कसे प्रत्युत्तर देणार, यावर ही जुगलबंदी बरीच रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news