Rahul Dravid IPL 2025 : द्रविड यांना नवा ‘रोजगार’ मिळणार! IPL 2025चे मैदान गाजवणार

‘या’ फ्रँचायझीला IPLचे दुसरे विजेतेपद जिंकून देणार?
Rahul Dravid IPL 2025
राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Dravid IPL 2025 : भारताला टी-20 विश्वचषकाचे जेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक राहुल द्रविड आता आयपीएलमध्ये प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. याबाबत लवकरच मोठी घोषणा केली जाऊ शकते.

द्रविड यांनी अद्याप याबाबत कसलाही खुलसा केलेला नाही. पण, भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर प्रशिक्षक म्हणून शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांनी गंमतीने म्हटले होते की, ‘मी आता बेरोजगार आहे आणि कोणत्याही ऑफरचे स्वागत आहे.’ अशातच त्यांना रॉयल्सकडून प्रशिक्षपदाची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. त्यांची आरआर फ्रँचायझी सोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे द्रविड यांना पुन्हा ‘रोजगार’ मिळाल्याची गमतीशीर चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली आहे. (Rahul Dravid IPL 2025)

51 वर्षीय द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचे नाते काही नवीन नाही. त्यांनी आरआर सोबत एक खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. द्रविड 2011 मध्ये रॉयल्सचे कर्णधारही होते. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी या संघासोबत तीन हंगाम खेळले आहेत. 2014 मध्ये, त्यांनी आरआर फ्रेंचायझीचे मार्गदर्शक म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याच नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने 2013 च्या आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 आणि 2015 पर्यंत ते संघाचे मार्गदर्शक राहिले. त्यांनी 2008 ते 2013 या कालावधीत आयपीएलमध्ये 89 सामने खेळले असून 11 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 2174 धावा केल्या आहेत.

2008 मध्ये रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या सत्राचे विजेतेपद पटकावले होते. ते त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत. हा दुष्काळ द्रविड यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर संपुष्टात येईल का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. (Rahul Dravid IPL 2025)

कुमार संगकारा 2021 पासून राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक आहेत. आता ते आपल्या पदावर कायम राहतात की राहुल द्रविड यांच्या नियुक्तीनंतर त्यांना काढून टाकले जाते येणा-या काळात स्पष्ट होईल. द्रविड 2015 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) जोडले गेले होते. ते भारताच्या अंडर-19 आणि भारत 'अ' संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) चेअरमन झाले. त्यांनी ऑक्टोबर 2021 पासून वरिष्ठ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला.

द्रविड यांनी टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. वास्तविक, वर्षातील 10 महिने प्रशिक्षक म्हणून प्रवास करून द्रविड यांना कुटुंबापासून दूर राहायचे नव्हते. मात्र, आयपीएलमध्ये असे काही असणार नाही. आयपीएलमध्ये त्यांना वर्षातून फक्त 2-3 महिने फ्रँचायझीसोबत राहावे लागेल. अशा परिस्थितीत ते आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news