

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Retirement : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीमुळे 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला.
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली, त्यानंतर टीम इंडियाला फॉलोऑनची समस्या भेडसावत होती, मात्र रवींद्र जडेजा आणि आकाश दीप यांच्यामुळे हे संकट हा धोका टळका.
यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 7 बाद 89 धावांवर घोषित केला आणि भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले. भारताने 5 व्या दिवशी दुसऱ्या डावात 2.1 षटकात बिनबाद आठ धावा केल्या होत्या. पण पावसामुळे चहाचा ब्रेक लवकर घ्यावा लागला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने खेळ होऊ शकला नाही. अखेर दिवसाचा खेळ रद्द केला. ज्यामुळे सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यानंतर फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग-11 चा भाग नव्हता परंतु त्याला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यानंतर तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग-11 मधून त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले. अशाप्रकारे ॲडलेड कसोटी हा अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला.
अश्विनच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला. 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने 106 कसोटी सामन्यात 537 विकेट घेतल्या होत्या. कसोटीत 500 हून अधिक बळी घेणारा अश्विन हा कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.
दोन्ही गोलंदाजांच्या निवृत्तीमध्येही एक आश्चर्यकारक योगायोग पाहायला मिळाला. 2008 मध्ये कुंबळेने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतरच निवृत्ती जाहीर केली होती. आता 2024 मध्ये अश्विननेही बीजीटीमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कुंबळेप्रमाणेच निवृत्ती जाहीर केली. एवढेच नाही तर कुंबळेने मिचेल जॉन्सनच्या रूपाने शेवटचा बळी घेतला होता. अश्विननेही मिशेल मार्शच्या रूपाने शेवटची विकेट पटकावली.