

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी (15 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर आणि संघासाठी वाईट बातमी आली. संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पीबीकेएसला मोठा धक्का बसला. संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन लीगच्या उर्वरित सामन्यांमधून जवळजवळ बाहेर पडला आहे. पीबीकेएसचे जलद गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी फर्ग्युसनची दुखापत गंभीर असल्याची पुष्टी केली आहे आणि तो लीगच्या उर्वरीत सामन्यांमधून बाहेर राहीर असे स्पस्ट केले.
प्रशिक्षक होप्स म्हणाले की, ‘फर्ग्युसन अनिश्चित काळासाठी संघाबाहेर राहिल. तो स्पर्धेत कधी पुनरागमन करेल हे निश्चित सांगता येणार नाही. मला वाटते की त्याची दुखापत खूपच गंभीर आहे,’
सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात फक्त 2 चेंडू टाकल्यानंतर फर्ग्युसन मैदानाबाहेर लंगडत गेला होता. त्या वेळी त्याने डाव्या मांडीला धरले होते. यानंतर झालेल्या चाचण्यांमध्ये त्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले आहे.
फर्ग्युसनने पीबीकेएससाठी 4 सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या. यात एसआरएचविरुद्धच्या सामन्याचा देखील समावेश आहे. फर्ग्युसन संघाच्या रणनितीचा महत्त्वाचा भाग राहिला. त्याला प्रामुख्याने मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी देण्यात आली. पीबीकेएसकडे त्याच्या जागी अनेक पर्याय आहेत. यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट, अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्ला उमरझाई आणि भारतीय विजयकुमार वैशाख यांचा समावेश आहे. परंतु संघाने अद्याप कोणत्याही नावाची घोषणा केलेली नाही.