

बंगळूर; वृत्तसंस्था : दुलीप ट्रॉफी 2023 चा अंतिम सामना सध्या बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. पश्चिम विभाग आणि दक्षिण विभाग यांच्यात सुरू असलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात दुसर्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दक्षिण विभागाने आपली पकड मजबूत केली होती. दक्षिण विभागाच्या पहिल्या डावातील 213 धावांच्या तुलनेत पश्चिम विभागाने 129 धावांपर्यंत 7 गडी गमावले होते. मात्र, पश्चिम विभागाकडून सलामीवीर पृथ्वी शॉने कठीण परिस्थितीत अर्धशतक झळकावले.
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही पृथ्वी शॉला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही. त्याला दोन्ही डावात 26 आणि 25 धावाच करता आल्या. मात्र, आता अंतिम फेरीत त्याने निश्चितच फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. शॉने 65 धावांच्या खेळीत 101 चेंडूंचा सामना केला आणि 9 चौकारही मारले. विजयकुमार वैशाखने त्याला बाद केले.
दक्षिण विभागाचा संघ पहिल्या डावात 213 धावांवर गारद झाला होता. यानंतर पश्चिम विभागीय संघाकडून पृथ्वी शॉची 65 धावांची खेळी त्यांच्यासाठी थोडीफार आशादायक ठरली; परंतु इतर मोठ्या खेळाडूंनी त्यांच्या खेळाने निराशा केली. सरफराज खान खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचवेळी सूर्यकुमार यादव 8 आणि चेतेश्वर पुजारा केवळ 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पश्चिम विभागाच्या संघाने 129 धावापर्यंत 7 विकेटस् गमावल्या होत्या. विद्वत कवेरप्पाने 4 तर विजयकुमार वैशाकने दोन विकेटस् घेतल्या