

पुणे : भारतीय अष्टपैलू खेळाडू प्रेमा रावत हिने अवघ्या १४ चेंडूंत नाबाद अर्धशतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. वरिष्ठांच्या महिला टी-२० चषक स्पर्धेत तिने महिला टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम नोंदवला.
पुण्यात पार पडलेल्या या सामन्यात उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करताना २४ वर्षीय प्रेमाने ३५७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तिने आपल्या तुफानी खेळीत ६ चौकार, ४ षटकारांसह नाबाद ५० धावा ठोकल्या. तिच्या या स्फोटक खेळीच्या जोरावर उत्तराखंडने निर्धारित २० षटकांत २ बाद १८७ धावांचा डोंगर उभारला आणि ८९ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्या नावावर आहे; तिने यापूर्वी झिम्बाब्वेविरुद्ध १५ चेंडूंत हा टप्पा गाठला होता. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या मेरी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या लॉरा हॅरिस यांनीही १५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आहे. फलंदाजीसोबतच प्रेमाने गोलंदाजीतही अवघ्या १२ धावा देत २ बळी घेतले.
या लढतीत १८ व्या षटकात मैदानात उतरलेल्या रावतने सलग ३ चौकार फटकावले. त्यानंतर १९ व्या षटकात १८ धावा वसूल केल्या. शेवटच्या षटकात २ षटकार व २ चौकारांसह तिने जलद अर्धशतक नोंदवले.