

लाहोर : क्रीडा विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार कबड्डीपटू उबेदुल्ला याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चक्क भारतीय जर्सी घालून आणि भारताचा तिरंगा फडकवत मैदानात उतरल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या क्रीडा वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात असून 'देशद्रोहा'चे आरोपही होऊ लागले आहेत.
बहरीनमध्ये नुकतीच एक कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पाकिस्तानमधून १६ खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, या खेळाडूंनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व न करता भारतीय संघ म्हणून खेळल्याचे उघड झाले आहे. विशेषतः उबेदुल्ला याने भारतीय जर्सी परिधान करून भारताचा राष्ट्रध्वज उंचावला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या गंभीर प्रकारावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तान कबड्डी महासंघाचे सचिव राणा सरवर यांनी सांगितले की, ‘बहरीनला गेलेला तो संघ पाकिस्तानचा अधिकृत राष्ट्रीय संघ नव्हता. त्या खेळाडूंनी वैयक्तिक पातळीवर किंवा अनधिकृतपणे तिथे सहभाग घेतला होता.’
तथापि, या घटनेने पाकिस्तानची नाचक्की झाल्याची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत महासंघाचे अध्यक्ष चौधऱी शाफे हुसेन यांनी २७ डिसेंबर रोजी एका विशेष तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत दोषी खेळाडूंवर आजीवन बंदी किंवा इतर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.