

IPL 2025 PBKS vs DC Shreyas Iyer |
जयपूर : आयपीएल २०२५ चा ६६ वा सामना शनिवारी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात पंजाब किंग्जवर ६ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आणि पाचव्या स्थानावर आपली मोहीम संपवली. पंजाबच्या या पराभवामुळे आता त्यांना टॉप-२ मध्ये लीग स्टेज पूर्ण करणे कठीण वाटत आहे. लीग स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना आता मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर खूप गंभीर दिसत होता. २००+ धावा करूनही त्याने कुठे चूक झाली हे सांगितले.
पराभवावर सांगताना अय्यरने कबूल केले की त्याचा संघ गोलंदाजीत कमी पडला. श्रेयस अय्यर म्हणाला, २०७ ही एक उत्तम धावसंख्या होती. बाउन्समध्ये काही फरक होता आणि चेंडू त्याच वेगाने येत नव्हता. त्याने गोलंदाजांना दोष देत म्हटलं की, मला असं वाटतं की आम्ही आमच्या गोलंदाजीतील लेंथवर पुरेशी शिस्त राखू शकलो नाही. आम्ही विकेट मिळवण्यासाठी बाउन्सरवर जास्त भर दिला आणि त्यामुळे नुकसान झालं. आम्ही हार्ड लेंथवर अचूक बॉलिंग करू शकलो नाही.” दरम्यान, पंजाब किंग्जने आधीच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे, त्यामुळे अय्यरला कोणतीही चिंता नाही.
पुढे अय्यर म्हणाला, “तुम्हाला नेहमी सकारात्मक आणि शांत राहणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवसाला तुम्ही नवीन मानसिकतेसह सामोरे गेलं पाहिजे. वर्तमानात टिकून राहणं महत्त्वाचं आहे. आता आम्हाला पुन्हा एकदा ड्रॉइंग बोर्डवर जावं लागेल आणि काही मजबूत योजना तयार कराव्या लागतील.” त्याचवेळी, त्याच्या बोटाच्या दुखापतीबद्दल तो म्हणाला की, मला वाटते की पुढील सामन्यापूर्वी ते ठीक होईल.
प्लेऑफचे चार संघ ठरले असले तरी त्यांच्यात टॉप-२ साठी रस्सीखेच आहे, पण दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंटस्, कोलकाता नाईट रायडर्स हे संघ जाता जाता प्लेऑफचे गणित बिघडवून जात आहेत. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पचका केला, आता त्यानंतर शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या स्थानावर झेप घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या पंजाब किंग्जचे पाय खेचले. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर ६ विकेटस्नी विजय मिळवून आपला शेवट गोड केला. या सामन्यामुळे आता प्लेऑफमधील चुरस आणखी वाढली आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०६ धावा केल्या, दिल्लीने हे आव्हान ३ चेंडू शिल्लक ठेवून गाठले.