

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 च्या 22 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS)ने चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा पराभव केला. पण हा सामना पंजाबचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलसाठी चांगला ठरला नाही. चेन्नईविरुद्धच्या आयपीएल सामन्यादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन खेळाडूला त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला असून एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या मीडिया रिलीजमध्ये सांगण्यात आले आहे की, मंगळवारी (दि. 8) न्यू चंदीगडमधील न्यू पीसीए स्टेडियमवर सीएसके विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन करताना आढळला. त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला आहे. मॅक्सवेलने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत (सामन्यादरम्यान अपशब्द वापरणे आणि क्रिकेट उपकरणे किंवा स्टेडियमचे नुकसान करणे) लेव्हल 1 चा गुन्हा केला. त्यानेही हा गुन्हा मान्य केला आहे.
सीएसके विरुद्ध मॅक्सवेल फलंदाजीत अपयशी ठरला. पण गोलंदाजीत त्याने आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिली. फलंदाजीत अवघी 1 धावा काढल्यानंतर तो अश्विनचा बळी ठरला. तथापि, गोलंदाजीत त्याने सीएसकेचा धडाकेबाज सलामीवीर रचिन रवींद्रला माघारी धाडले. त्याने रचिनला 36 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. चेन्नईच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 60 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. यानंतर, 7 व्या षटकात येताच मॅक्सवेलने पंजाबला पहिले यश मिळवून दिले.