पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics) सातव्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. ४) भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तर मेन्स क्लब थ्रो मध्ये धर्मबीरने सुवर्णपदक आणि प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावले. भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य पदके जिंकली आहेत.
भारत बुधवारी २५ पदकांच्या जवळ पोहोचला होता. सचिन खिलारीच्या रुपाने रौप्य पदकाने दिवसाची सुरुवात झाली. धरमबीर आणि प्रणव सुरमा यांनी मेन्स क्लब थ्रो स्पर्धेत भारताला दोन पदके मिळवून दिली. पुरुषांच्या क्लब थ्रो F51 फायनलमध्ये धरमबीरने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक जिंकले. भारताच्या एकुण पदकांची संख्या २४ झाली आहे. धरमबीरने चौथ्या प्रयत्नात ३४.९२ मीटर फेक केला. प्रणव सुरमाने पहिल्याच प्रयत्नात ३४.५९ मीटर फेक केला. (Paris Paralympics)
हरविंदर सिंगने प्री-क्वार्टर फायनलमध्ये इंडोनेशियाच्या सेतियावान सेटियावानचा ७-३ असा पराभव करत चायनीज तैपेईच्या त्सेंग लुंग हुईचा ६-२ असा पराभव केला. त्यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या हेक्टर ज्युलिओ रामिरेझचा ६-२ असा पराभव केला. त्यानंतर हरविंदरने उपांत्य फेरीत त्याचा इराणी प्रतिस्पर्धी मोहम्मद रेझा अरब अमेरी याचा ७-३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.