

शिझुओका-जपान : भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर आणि सुकांत कदम यांनी जपान पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अर्धा डझनहून अधिक सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत. प्रमोद भगतने यामध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी या तीनही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून ‘गोल्डन हॅट्ट्रिक’ केली, तर टोकियो पॅरा ऑलिम्पिक विजेता कृष्णा नागरने दोन सुवर्णपदके पटकावली; त्याने एकेरी आणि मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवले. सुकांत कदमने पुरुष दुहेरीत सुवर्ण आणि एकेरीत रौप्यपदक जिंकले.
एसएल 3 गटात प्रमोद भगत सर्वात प्रभावी खेळाडू ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या डाईसुके फुजिहारा विरुद्ध पहिला गेम 17-21 ने गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या गेममध्ये 16-19 अशा पिछाडीवर असताना, भगतने सामना बरोबरीत आणला आणि निर्णायक गेममध्ये निर्दोष खेळ करत 21-10 ने विजय मिळवला. एक तास 33 मिनिटे चाललेला हा सामना भगतने 17-21, 21-19, 21-10 अशा फरकाने जिंकला.
पुरुष दुहेरीत, भगत आणि सुकांत कदम या जोडीने भारतीय खेळाडू जगदीश दिल्ली आणि नवीन शिवकुमार यांचा 21-17, 18-21, 21-16 असा पराभव केला. यानंतर, मनीषा रामदास सोबत खेळताना मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावत त्याने सुवर्णपदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. त्यांनी अंतिम सामन्यात सहकारी भारतीय खेळाडू रितेश कुमार आणि तुळसीमाथी मुरुगेसन यांचा 21-19, 21-19 अशा फरकाने 29 मिनिटांत पराभव केला. दुसरीकडे, कृष्णा नागरने पुन्हा एकदा आपला उत्कृष्ट दर्जा सिद्ध करत एसएच6 पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीची विजेतेपदे जिंकली.