कोलंबो; वृत्तसंस्था : आशिया कपच्या सुपर-4 फेरीतील श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी 20 वर्षीय युवा खेळाडूला संघात संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सुपर-फोर सामना जो कोणी जिंकेल, त्यांचा सामना 17 सप्टेंबरला अंतिम फेरीत भारताशी होणार आहे.
सुपर-4 फेरीत बाबरच्या संघाला भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना कोणत्याही किमतीत जिंकावाच लागणार आहे, पण त्याआधीच संघाला 440 व्होल्टचा धक्का बसला. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह खांद्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नुकत्याच भारताविरुद्धच्या सुपर-फोर टप्प्यातील सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती.
भारताविरुद्ध गोलंदाजी करताना नसीम महागडा गोलंदाज ठरला. त्याने 9.2 षटके 53 धावा दिल्या, तसेच त्याला एकही विकेट घेता आली नाही. दरम्यान, या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आणि त्यात त्यांना नसीमची दुखापत गंभीर असल्याचे समजले. त्यामुळे त्याला विश्रांती घेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर नसीमला मायदेशी पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापना घेतला. नसीमने आशिया कपमध्ये 7 विकेट घेतल्या आहेत.