बेन स्टोक्सचे पुनरागमन, पाकिस्तानविरुद्धच्या दुस-या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 जाहीर
पुढारी ऑनलाईन डेस्क : PAK vs ENG 2nd Test Ben Stokes : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना एक डाव आणि 47 धावांनी जिंकल्यामुळे इंग्लिश संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना मुलतानच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. ज्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. नियमित कर्णधार बेन स्टोक्सने संघात पुनरागमन केले आहे. दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. तसेच मॅथ्यू पॉट्स यालाही संघात स्थान मिळाले आहे.
‘हे’ दोन खेळाडू बाहेर
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून दोन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये गस ॲटकिन्सन आणि ख्रिस वोक्स यांचा समावेश आहे. मुलतानमधील पहिल्या कसोटी सामन्यात ॲटकिन्सन आणि वोक्स यांनी अनुक्रमे 39 आणि 35 षटके टाकली. दुसरीकडे बेन स्टोक्सच्या पुनरागमनानंतर इंग्लंड संघाला बळ मिळणार आहे. तो त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने इंग्लंड संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. मात्र तो गोलंदाजी करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हॅरी ब्रूकचे पहिल्या कसोटीत त्रिशतक
मुलतान कसोटीत पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 556 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लिश संघाने जोरदार प्रत्युत्तर दिले. हॅरी ब्रूकने त्रिशतक तर जो रूटने द्विशतक झळकावले होते. या जोरावर इंग्लंडने 823 धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले. इंग्लिश गोलंदाजांनी यजमान संघाचा दुसरा डाव केवळ 220 धावांत गुंडाळला आणि पहिल्या कसोटीत विक्रमी विजय मिळवला.
दुस-या कसोटीसाठी बाबर, आफ्रिदीला डच्चू
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी संघ चांगली कामगिरी करत नाहीये. शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ सलग 6 कसोटी सामने हरला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या खेळाडूंना दुसऱ्या कसोटीसाठी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मॅट पॉट्स, जॅक लीच, शोएब बशीर