पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan vs Bangladesh 1st Test : बांगलादेशने रावळपिंडी कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सामना जिंकण्यासाठी बांगलादेशला 30 धावांचे छोटे लक्ष्य मिळाले होते जे त्यांनी एकही विकेट न गमावता सहज गाठले. विशेष म्हणजे बांगलादेशी संघाचा पाकिस्तानविरुद्धचा कसोटी प्रकारातील हा पहिलाच विजय आहे.
मुशफिकर रहीम, हसन मिराज, शकीब अल हसन हे बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरले. रहिमने पहिल्या डावात 191 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या डावात मिराज (4 विकेट) आणि शकीब अल हसन (3 विकेट) यांनी दमदार गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला. रहीमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
पाकिस्तानने पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. यजमान संघाकडून सौद शकील (141) आणि मोहम्मद रिझवान (नाबाद 171) यांनी शानदार शतके झळकावली. सॅम अयुबने 56 धावांचे योगदान दिले. बाबर आझम काही विशेष करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला.
प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावांपर्यंत मजल मारली आणि 117 धावांची आघाडी घेतली. मुशफिकुर रहीमने 191 धावांची खेळी केली. 341 चेंडूंचा सामना करताना त्याने 22 चौकार आणि 1 षटकार लगावले. याआधी सदमान इस्लामने 93 धावांची दमदार खेळी केली. इस्लामने 12 चौकार मारले. तर लिटन दासने अर्धशतक झळकावले. त्याने 78 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावा केल्या. मेहदी हसन मिराजने 77 धावांची उपयुक्त खेळी केली. मोमिनुल हकने 50 धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाज चालला नाही. रिझवानने 80 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने 6 चौकार मारले. सलामीवीर म्हणून शफिकने 37 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले. सॅम अयुब 1 धावा करून बाद झाला. बाबर आझम 22 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार मारले. सौद शकील शून्यावर बाद झाला. अशाप्रकारे पुढच्याही फलंदाजांनी निराशा केली. परिणामी त्यांचा संपूर्ण संघ 146 धावांत गारद झाला. ज्यामुळे बांगलादेश संघाला विजयासाठी अवघ्या 30 धावांचे लक्ष्य मिळाले.त्यांनी दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावली नाही. झाकीर हसनने नाबाद 15 आणि सदमानने नाबाद 9 धावा केल्या. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.