

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Team Fined : पाकिस्तान संघाचा न्यूझीलंड दौरा संपला आहे. हा दौ-यात पाकिस्तानी संघाची अब्रू धुळीस मिळाली. संघाला प्रथम न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही 3-0 असा व्हाईटवॉश झाला. या संपूर्ण मालिकेदरम्यान, पाकिस्तान संघासोबत आणखी एक मोठी समस्या दिसून आली. हा संघ सातत्याने स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही संघाने तीच चूक केली आणि त्यामुळे संपूर्ण संघावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
माउंट मौंगानुई येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा 43 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान, मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाक संघ निर्धारित वेळेत त्यांची सर्व षटके टाकू शकला नाही. या कारणास्तव, संपूर्ण संघाला स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या 5 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसीने एक निवेदन जारी करून याबद्दल माहिती दिली. पाकिस्तान संघाने त्यांच्या डावाची षटके निर्धारित वेळेत पूर्ण केली नाहीत. आयसीसीच्या नियमांनुसार, निर्धारित वेळेत कमी षटके टाकल्यास संघातील सर्व खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 5 टक्के दंड आकारला जातो. या नियमानुसार तिसरे पंच मायकेल गॉफ, चौथे पंच वेन नाईट्स तसेच मैदानी पंच क्रिस ब्राउन आणि पॉल रीफेल यांनी त्यांच्यावर स्लो ओव्हर रेटचे आरोप निश्चित केले. त्यानंतर पाक कर्णधार रिझवानने अपली ही चूक मान्य केली. त्यानुसार आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीजचे जेफ क्रो यांनी हा दंड ठोठावला, असे निवेदनात म्हटले आहे.