

ढाका : पाकिस्तान क्रिकेट संघाला पहिल्या टी-20 सामन्यात बांगला देशकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करणार्या पाकिस्तानला 110 धावांवर गुंडाळल्यानंतर बांगला देशने 15.3 षटकांत 3 विकेटस्च्या मोबदल्यात ही मॅच जिंकली. तीन विकेटस् घेणारा तस्कीन अहमद व 56 धावांची खेळी करणारा परवेझ होसैन एमोन हे या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी खेळपट्टीला दोष दिला आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानने 44 धावांची खेळी केली. त्यानंतर अब्बास आफ्रिदी (22) व खुशदील शाह (17) यांनी दुहेरी धावसंख्या केली. पाकिस्तानचे सात फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले. त्यांचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 110 धावांवर गारद झाला. मुस्तफिजूर रहमानने दोन विकेटस् घेतल्या. बांगला देशकडून परवेझने 39 चेंडूंत नाबाद 56 धावांची खेळी केली, तर तौहिद हृदोयने 36 धावांचे व जाकेर अलीने 15 धावांचे योगदान दिले.
या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रशिक्षक हेसन यांनी ढाकाच्या खेळपट्टीकडे बोट दाखवले. 2025 चा आशिया चषक आणि 2026 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करत असताना अशा खेळपट्टीवर खेळायला लागणे, हे योग्य नाही. ही खेळपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची नव्हती.
ते म्हणाले, माझ्या मते ही आदर्श खेळपट्टी नव्हती. संघ आशिया चषक आणि टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. त्यांना अशा खेळपट्टीवर खेळावे लागतेय, याचा स्वीकार केला जाणार नाही. पराभवानंतर मी कारणे देत नाही. परंतु, आमचेही काही निर्णय चुकले; पण ही खेळपट्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही.
बांगला देशचा सलामीवीर परवेझ याने हेसन यांच्या मताला उत्तर दिले. तो म्हणाला, आम्हाला तसे वाटत नाही. आम्ही हे लक्ष्य 16 षटकांच्या आत पार केले. आम्ही 20 षटके पूर्ण खेळलो असतो, तर 150-160 धावा नक्कीच केल्या असत्या. त्यांना खेळपट्टीवर नीट खेळता आले नाही आणि आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले खेळलो.