नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेटमध्ये वर्ल्डकपमध्ये केलेल्या शिमग्यानंतरचे कवित्व सुरू झाले असून स्पर्धेतील गोलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मोर्केलने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (cricket world cup 2023)
मोर्केल प्रशिक्षक म्हणून जून महिन्यापासून पाकिस्तानी संघासोबत जोडला गेला होता. सोमवारी त्याने आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानला विश्वचषकातील नऊपैकी केवळ चार सामने जिंकता आल्याने मॉर्ने मोर्केलने हा निर्णय घेतला.
वन डे विश्वचषक 2023 पाकिस्तानी संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. त्यांना अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाकडून देखील पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीला दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानची विजयाची गाडी रुळावरून घसरली अन् सलग चार सामन्यांमध्ये बाबर आझमच्या संघाला पराभव पत्करावा लागला. जगातील घातक गोलंदाजी अॅटॅक म्हणून प्रसिद्धी मिळवणार्या पाकिस्तानी गोलंदाजांची मात्र चांगलीच धुलाई झाली. शाहिन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ या प्रमुख गोलंदाजांना संपूर्ण स्पर्धेदरम्यान पॉवर प्लेत केवळ तीन बळी घेता आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप मॉर्केलची रिप्लेसमेंट जाहीर केली नाही. आगामी काळात बाबर आझमचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार असून तिथे तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. (cricket world cup 2023)
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभव पाकिस्तानला महागात पडला. नेदरलँड आणि श्रीलंकेला नमवून शेजार्यांनी चांगली सुरुवात केली होती. पण, भारताने दारुण पराभूत केल्यानंतर पाकिस्तानला सलग तीन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने शेजार्यांना पराभवाची धूळ चारली अन् पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर झाला.