पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलतान कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लिश फलंदाजांनी यजमान पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई करत हाहाकार माजवला. प्रथम फलंदाजी करताना पाकने त्यांच्या पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या इंग्लंडने 7 गडी गमावून 823 धावांचा डोंगर रचला. यादरम्यान जो रूट (262) आणि हॅरी ब्रूक (317) यांच्यात 454 धावांची भागीदारी झाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. या दोन्ही खेळाडूंनी 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
कसोटी क्रिकेटमधील ही एकूण चौथी सर्वात मोठी भागीदारी आहे. याशिवाय, कसोटी इतिहासात असे केवळ तिसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा दोन फलंदाजांनी एकाच डावात 250 हून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय रूट आणि ब्रूक यांनी इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. या दोघांनी 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. यापूर्वी कॉलिन कॉर्डे आणि पीटर मे यांनी 1957 मध्ये 411 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
1958 मध्ये वेस्ट इंडिजने किंग्स्टन येथे पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 790 करून डाव घोषित केला होता. इंग्लंड हा जगातील एकमेव संघ आहे ज्याने एका कसोटी डावात 800 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 2 संघांना 900 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. यामध्ये श्रीलंका पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडने 249 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर रूट आणि ब्रूक यांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोचवले. ब्रूकने त्रिशतक झळकावले तर रूटने शानदार द्विशतक झळकावले. रुट 262 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे इंग्लंडने आपला पहिला डाव 7 बाद 823 धावांवर घोषित केला. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा हा विक्रम आहे. यापूर्वी भारताच्या राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 2004 च्या लाहोर कसोटी सामन्यात 410 धावांची भागीदारी केली होती.
इंग्लंडसाठी हॅरी ब्रूकने शानदार त्रिशतक झळकावत वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. सेहवागने मुलतानमध्ये 309 धावांची इनिंग खेळली होती. ब्रूकने 317 धावांची इनिंग खेळून सेहवागला मागे टाकले आहे. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो इंग्लंडचा सहावा फलंदाज ठरला.
रूट-ब्रूक (454 धावांची भागिदारी)
मुलतान येथे सुरू असलेल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रुटने 375 चेंडूत 262 धावा केल्या. त्याने 17 चौकार मारले. त्याला ब्रूकने चांगली साथ दिली आणि 322 चेंडूत 317 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 29 चौकार आणि 3 षटकार आले. दोघांनी 522 चेंडूंचा सामना करत 454 धावा जोडल्या.
पीटर मे-कॉलिन काउड्री (411 धावांची भागिदारी)
रूट-ब्रूक जोडीने पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांचा विक्रम मोडला आहे. या दोघांनी 1957 मध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 411 धावांची भागीदारी केली होती. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 186 धावांत सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 474 धावा केल्या. पीटर यांनी दुसऱ्या डावात 154 धावा केल्या होत्या. काउड्री यांच्या बॅटमधून 285 धावा झाल्या. त्यावेळी इंग्लंड संघाने 4 बाद 883 धावांवर डाव घोषित केला होता. तो सामना अनिर्णित राहिला.
स्टोक्स-बेअरस्टो (399 धावांची भागिदारी)
या यादीत इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 399 धावांची भागीदारी केली होती. पहिल्या डावात स्टोक्सने 198 चेंडूंचा सामना करत 258 धावा केल्या. बेअरस्टोने 191 चेंडूत 150 धावा केल्या. इंग्लंडने 6 बाद 629 धावांवर डाव घोषित केला. हा सामनाही अनिर्णित राहिला.
मॉरिस लेलँड-लिओनार्ड हटन (382 धावांची भागिदारी)
1938 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला गेला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 903 धावा केल्या. लिओनार्ड हटन यांनी 847 चेंडूत 364 धावा केल्या होत्या. त्यांच्या बॅटमधून 35 चौकार आले. मॉरिस लेलँड यांनी 438 चेंडूत 187 धावांची खेळी खेळली. त्यांच्या बॅटमधून 17 चौकार आले. दोघांमध्ये 382 धावांची भागीदारी झाली. इंग्लंडने एक डाव आणि 579 धावांनी विजय मिळवला.