

माऊंट मॉन्गनुई : जेकब डफीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा 138 धावांत खुर्दा पाडत 323 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची ही मालिका 2-0 अशा फरकाने खिशात घातली आहे. डफीने 42 धावांत 5 बळी घेत विंडीज संघाचे कंबरडे मोडले आणि यातून ते अजिबात सावरू शकले नाहीत.
संपूर्ण मालिकेत डफीने 15.4 च्या सरासरीने 23 बळी घेत ‘मालिकावीर’ पुरस्कारावर नाव कोरले. प्रमुख गोलंदाजांच्या दुखापतींमुळे डफीने या मालिकेत न्यूझीलंडच्या आक्रमणाचे नेतृत्व समर्थपणे पेलले.
पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजला विजयासाठी 462 धावांचे कठीण लक्ष्य होते. सलामीवीर ब्रँडन किंग (67) आणि जॉन कॅम्पबेल यांनी प्रारंभी कडवी झुंज दिली. मात्र, डफीने ही जोडी फोडताच वेस्ट इंडिजचा डाव पत्त्यासारखा कोसळला.
उपाहारापूर्वीच विंडीजचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. उपाहारानंतरही डफी आणि अजाज पटेल यांनी उर्वरित फलंदाजांना फार काळ टिकू दिले नाही. अजाज पटेलने 5 वर्षांनंतर मायदेशातील पहिल्याच कसोटीत 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंड पहिला डाव : 8/575 घोषित. विंडीज पहिला डाव : 420. न्यूझीलंड दुसरा डाव : 2/306 घोषित. विंडीज दुसरा डाव (टार्गेट 462) : 80.3 षटकांत सर्वबाद 138.( ब्रँडॉन किंग 67. जेकब डफी 5/42, अजाज पटेल 3/23, ग्लेन फिलिप्स, रचिन प्रत्येकी 1 बळी).
वेगवान गोलंदाज जेकब डफीने 42 धावांत 5 बळी घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या कामगिरीसह डफीने महान क्रिकेटपटू रिचर्ड हॅडली यांचा एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक (80) बळी घेण्याचा न्यूझीलंडचा विक्रम मोडीत काढला.