

पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions Trophy IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. 9) दुबईमध्ये अंतिम सामना खेळला जाणार आहे. या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडची चिंता वाढली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्री हा जेतेपदाचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक हेनरिक क्लासेनचा झेल घेताना उजव्या खांद्याला दुखापत झाली. तथापि, हेन्रीने नंतर दोन षटके टाकली आणि क्षेत्ररक्षणही करताना दिसला.
किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी शुक्रवारी (दि. 7) हेन्रीच्या दुखापतीविषयी सांगितले की, ‘अंतिम सामन्याच्या सुमारे 48 तास आधी हेन्रीच्या तंदुरुस्तीबाबत अजूनही शंका वाटत आहे. मला वाटते आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट म्हणजे तो उपांत्य सामन्यात पुन्हा गोलंदाजी करायला आला. त्याने क्षेत्ररक्षणही केले. पण खांद्यावर पडल्यामुळे त्याला अजूनही वेदना होत आहेत. सध्या त्याचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. आम्ही त्याला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी देऊ इच्छितो. मात्र, त्याची स्थिती थोडी अनिश्चित आहे. आशा आहे की तो लवकरच बरा होईल.’
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यादरम्यान हेन्रीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. क्षेत्ररक्षण करताना, तो 29 व्या षटकात हेनरिक क्लासेनचा झेल घेण्यासाठी लॉन्ग ऑनकडे धावला आणि डायव्ह मारला. त्याने झेल घेतला पण तो जखमी झाला. यानंतर तो काही काळ मैदानाबाहेरही गेला. तथापि, तो सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरला. त्याने दोन षटके टाकली. दुखापतीनंतर मैदानात परतल्यानंतर तो फिल्डिंग करताना डायव्हिंग करतानाही दिसला.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मॅट हेन्री आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्यात अव्वल स्थानी आहे. त्याने 16.7 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या गट सामन्यात हेन्रीची कामगिरी दमदार राहिली. किवी वेगवान गोलंदाजाने कहर केला आणि 8 षटकांत फक्त 42 धावा देत 5 बळी घेतले. हेन्रीने विराट कोहली, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यांसारख्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे जर जर हेन्रीने जेतेपदाचा सामना खेळला नाही तर तो न्यूझीलंडसाठी मोठा धक्का असेल.
जर हेन्री खेळू शकला नाही, तर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जेकब डफीला प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. डफीने सध्याच्या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये झालेल्या त्रिकोणी मालिकेत एक सामना खेळला. त्या सामन्यात डफीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 48 धावा देऊन 1 विकेट घेतली.