

बुलावायो : वेगवान गोलंदाजांच्या भेदक मार्याच्या जोरावर न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा दुसर्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 359 धावांनी धुव्वा उडवला. क्वीन्स स्पोर्टस् क्लबवर झालेला हा सामना तिसर्याच दिवशी जिंकत न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
न्यूझीलंडने आपला पहिला डाव 3 बाद 601 धावांवर घोषित केल्यानंतर, विजयासाठी डोंगरएवढे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. त्यांचा दुसरा डाव अवघ्या 37.4 षटकांत 117 धावांवर संपुष्टात आला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर दडपण आणले. मॅट हेन्रीने डावाच्या तिसर्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला शून्यावर बाद करत झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. बेनेटचा हा सामन्यातील दुसरा ‘डक’ होता. त्यानंतर हेन्रीने ब्रेंडन टेलरला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. जेकब डफीने शॉन विल्यम्सला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले, तर मॅथ्यू फिशरने कर्णधार क्रेग इर्विनला बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 4 बाद 35 अशी केली.
यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या झॅक फोक्सने झिम्बाब्वेच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. आपला पहिलाच कसोटी सामना खेळणार्या फोक्सने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने एकामागोमाग एक 5 बळी घेत झिम्बाब्वेचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसर्या डावात 37 धावांत 5 बळी घेतले, तर सामन्यात एकूण 77 धावांत 9 बळी घेण्याची किमया केली. झिम्बाब्वेकडून तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निक वेल्चने एकाकी झुंज दिली. त्याने नाबाद 47 धावांची खेळी केली, पण दुसर्या बाजूने त्याला एकाही फलंदाजाची समर्थ साथ मिळाली नाही.
न्यूझीलंडकडून पहिल्या डावात 153 धावांची शानदार खेळी करणार्या डेव्हॉन कॉन्वेला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले, तर मालिकेत एकूण 16 बळी घेणार्या मॅट हेन्रीला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या दणदणीत विजयामुळे न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत महत्त्वपूर्ण गुण मिळवले आहेत.
तिसरा सर्वात मोठा विजय : कसोटी इतिहासातील हा एक डाव आणि धावांच्या फरकाने मिळवलेला तिसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी इंग्लंडने 1938 मध्ये ऑस्ट्रेलियावर (एक डाव आणि 579 धावा) आणि ऑस्ट्रेलियाने 2001-02 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर (एक डाव आणि 360 धावा) विजय मिळवला होता.
न्यूझीलंडचा विक्रम : न्यूझीलंडचा हा कसोटीतील सर्वात मोठा विजय ठरला. त्यांनी आपलाच 2011-12 मधील झिम्बाब्वेविरुद्धचा (एक डाव आणि 301 धावा) विक्रम मोडला.
झिम्बाब्वेचा सलग सहावा पराभव : बांगला देशविरुद्धच्या विजयानंतर झिम्बाब्वेचा हा सलग सहावा पराभव आहे, ज्यापैकी चार पराभव डावाने झाले आहेत.