न्यूझीलंडने कॅप्टन बदलला! पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी नवा संघ जाहीर
पुढारी ऑनलाईन डेस्क : New Zealand vs Pakistan T20 Series : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे किवी संघाचे 25 वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर न्यूझीलंड संघात मोठे बदल दिसून आले आहेत. किवी संघाला पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे, ज्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
न्यूझीलंड संघाची धुरा मिशेल सँटनरऐवजी मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी सँटनर उपलब्ध नाही. सँटनर व्यतिरिक्त, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स सारखे अनेक स्टार खेळाडू देखील या संघाचा भाग नाहीत.
संघातून स्टार खेळाडू गायब
डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स आणि रचिन रवींद्र हे पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. तर केन विल्यमसनने देखील स्वतःला अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसतील. लॉकी फर्ग्युसन हा पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे तर मिशेल सँटनर आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. तर, ग्लेन फिलिप्स गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. केन विल्यमसन यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. तो पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये भाग घेईल. पीएसएल पुढील महिन्याच्या 11 तारखेपासून सुरू होईल.
ईश सोधी आणि बेन सियर्सचे पुनरागमन
श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेत खेळू न शकलेला ईश सोधी संघात परतला आहे. त्याच वेळी, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळलेला बेन सीयर्सनेही पुनरागमन केले आहे. तर आयसीसी स्पर्धेनंतर वेगवान गोलंदाजांच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार काइल जेमीसन आणि विल ओ'रोर्क हे पाकिस्ताविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध असतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा, पण दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकलेल्या मॅट हेन्रीची मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठी निवड झाली आहे. तथापि, त्यापूर्वी त्याला फिटनेस चाचणी द्यावी लागेल. फिन अॅलन, जिमी नीशम आणि टिम सेफर्ट यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना : 16 मार्च (हॅगली ओव्हल, ख्राइस्टचर्च)
दुसरा टी-20 सामना : 18 मार्च (ओटागो विद्यापीठ, ड्युनेडिन)
तिसरा टी-20 सामना : 21 मार्च (ईडन पार्क, ऑकलंड)
चौथा टी-20 सामना : 23 मार्च (बे ओव्हल, टॉरंगा)
पाचवा टी-20 सामना : 25 मार्च (स्काय स्टेडियम, वेलिंग्टन)
न्यूझीलंडचा संघ पुढीलप्रमाणे :
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन अॅलन, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फॉल्क्स (4था, 5वा सामना), मिच हे, मॅट हेन्री (4था, 5वा सामना), काइल जेमिसन (1ला, 2रा, 3रा सामना), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ'रोर्क (1ला, 2रा, 3रा सामना), टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.

