MI vs PBKS | पंजाबचा विजयाचा चौकार; मुंबई इंडियन्सचा धुव्वा

प्रभसिमरन-श्रेयसची निर्णायक अर्धशतके
MI vs PBKS |
MI vs PBKS | पंजाबचा विजयाचा चौकार; मुंबई इंडियन्सचा धुव्वा
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : अनुभवी क्विंटन डी कॉकच्या तडफदार शतकानंतरही मुंबई इंडियन्सला गुरुवारी ‘आयपीएल’ साखळी सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध 7 गड्यांनी नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. एकीकडे, पंजाबसाठी हा 5 सामन्यांतील चौथा विजय ठरला तर दुसरीकडे, मुंबईसाठी 5 सामन्यांतील चौथा पराभव ठरला. या लढतीत मुंबईने 20 षटकांत 6 बाद 195 धावांचा डोंगर रचला. मात्र, पंजाबनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत 16.3 षटकांतच 3 बाद 198 धावांसह विजयाचे लक्ष्य गाठले.

विजयासाठी 196 धावांचा पाठलाग करताना पंजाबतर्फे प्रभसिमरन सिंगने 39 चेंडूंत 80 धावांचा झंझावात साकारला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने 35 चेंडूंत 66 धावा फटकावत सर्व अडसर सहजपणे दूर सारले. प्रभसिमरनच्या खेळीत 11 चौकार व 2 षटकार, तर श्रेयसच्या खेळीत 5 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. प्रियांश आर्य 15, कूपर कोनोली 17 स्वस्तात बाद झाले असले, तरी प्रभसिमरन व श्रेयसच्या तडफदार अर्धशतकांमुळे पंजाबला विजयासाठी फारसे वेगळे प्रयास करावे लागले नाहीत. मुंबईचा स्टार स्पीडस्टार जसप्रीत बुमराहची विकेटची पाटी या सामन्यातही कोरीच राहिली. त्याला 4 षटकांत 41 धावा मोजाव्या लागत असताना अगदी एकही बळी घेता आला नाही.

डी कॉकची फटकेबाजी : प्रारंभी, अनुभवी क्विंटन डी कॉकच्या झंझावाती शतकाने वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पडला असला, तरी मुंबई इंडियन्सची मधली फळी पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि यामुळे त्यांना 200 पार जाण्याची संधी असतानाही 195 धावांवर समाधान मानावे लागले. डी कॉकचा ‘विंटेज’ शो : सुरुवातीपासूनच डी कॉक एका वेगळ्या लयीत खेळताना दिसला.

एका बाजूने विकेटस् पडत असताना त्याने टी-20 फलंदाजीचा मास्टरक्लास सादर केला. अवघ्या 60 चेंडूंत 112 धावांची नाबाद खेळी करणार्‍या डी कॉकने 8 चौकार, 7 उत्तुंग षटकार खेचले. 186.67 च्या स्ट्राईक रेटने खेळत त्याने एकहाती मुंबईचा डोलारा सावरला. नमन धीरने (31 चेंडूंत 50 धावा) त्याला मोलाची साथ दिली. मात्र, तो बाद होताच मुंबईचा डाव पुन्हा अडखळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news