

Mumbai Indians New Jersey launch
मुंबई : पाच वेळा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरणारा 'मुंबई इंडियन्स'चा संघ आता आगामी आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामासाठी एका नव्या जोमाने आणि नव्या रुपात सज्ज झाला आहे. शुक्रवारी (दि. ६) एका दिमाखदार सोहळ्यात मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत जर्सीचे अनावरण केले, ज्यामध्ये परंपरेचा मान आणि आधुनिकतेची झलक पाहायला मिळत आहे.
मुंबई इंडियन्सची नवी जर्सी म्हणजे केवळ एक पोषाख नसून तो कोट्यवधी चाहत्यांच्या अस्मितेचा हुंकार आहे. संघाने आपला पारंपारिक निळा आणि सोनेरी रंग कायम ठेवला असला, तरी यंदाच्या डिझाईनमध्ये कमालीची नजाकत पाहायला मिळत आहे. ही नवी जर्सी म्हणजे अरबी समुद्राच्या अथांग लाटा आणि मुंबईच्या स्वप्नवत झगमगाटाचे एक अनोखे मिश्रण भासते. मैदानावर जेव्हा खेळाडू ही जर्सी परिधान करून उतरतील, तेव्हा मुंबईचा तोच जुना दबदबा पुन्हा एकदा प्रस्थापित होणार, याची प्रचिती येते.
यंदाच्या हंगामातही अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हाच मुंबईच्या 'पलटण'चा सेनापती असणार आहे. गेल्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्ले-ऑफपर्यंतची मजल मारली होती, मात्र एलिमिनेटरमध्ये पंजाब किंग्जने त्यांना धूळ चारली होती. त्यामुळे मागिल हंगामात पदरी पडलेली ती निराशा यंदाच्या हंगामात धुतली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पराभवाच्या त्या जखमा आता नव्या उमेदीत रूपांतरित झाल्या असून, हार्दिकच्या रणनीतीकडे चाहत्यांचे डोळे लागून आहेत.
मुंबईचे वाघ सध्या विश्रांतीच्या मूडमध्ये नसून सराव सत्रात घाम गाळत आहेत. शार्दूल ठाकूर आणि दीपक चहर यांसारखी अनुभवी अस्त्रे सध्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील टी-20 चषकात आपल्या फॉर्मची चाचपणी करत आहेत. मुख्य सराव शिबिराचा बिगुल १२ ते १५ मार्च दरम्यान वाजण्याची शक्यता आहे. टी-२० विश्वचषकाचा धुरळा बसल्यानंतर विदेशी खेळाडूंच्या आगमनाने या ताफ्याला पूर्णत्व येणार आहे.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी मुंबईने आपली जर्सी लाँच केली, त्याच दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जनेही (CSK) आपल्या नव्या साजाचे दर्शन घडवले. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये जेतेपदावर नाव कोरल्यानंतर, आता सहाव्या ट्रॉफीवर आपले अधिराज्य गाजवण्यासाठी मुंबईचा हा नवा 'लूक' सज्ज झाला आहे.
२८ मार्चपासून आयपीएलचा हा महासंग्राम सुरू होणार आहे. नव्या जर्सीतील ही नवी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करणार की नवा विक्रम प्रस्थापित करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.