

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya IPL Ban : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025)च्या आगामी हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच, 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या हंगामातील पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. आयपीएल 2025ची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्याने होईल. दुसऱ्या दिवशी, 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना चेपॉक येथे मुंबईशी होईल. पण या सामन्यापूर्वी एमआयचा कर्णधार हार्दिक पंड्या अडचणीत सापडला आहे. त्याला मागील हंगामात केलेली एक चूक भोवणार आहे.
हार्दिक पंड्याने गेल्या हंगामातच मुंबईचे कर्णधारपद सांभाळले आणि त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यांनी 14 पैकी 10 सामने गमावले तर केवळ 4 सामने जिंकले होते. ज्यामुळे हा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर राहिला. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील शेवटच्या आयपीएल 2024 च्या ग्रुप स्टेज सामन्यानंतर हार्दिक पंड्याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच त्याच्यावर आयपीएल 2025 मधील फ्रँचायझीच्या पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली. परिणामी पंड्या 2025 च्या हंगामातील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. पण तो 29 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध फ्रँचायझीच्या दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्यास सज्ज असेल.
मुंबई संघाने आयपीएल 2024 मधील त्यांचा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला आणि या सामन्यात मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याला स्लो ओव्हर रेटसाठी 30 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आणि इम्पॅक्ट खेळाडूसह प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला. त्याच वेळी, आयपीएल 2024 मध्ये, मुंबई संघाला तीनदा किमान षटकांचा वेग राखण्यात अपयश आले. या कारणास्तव, कर्णधार हार्दिकवरही एका सामन्याची बंदी घालण्यात आली. त्यानंतर गेल्या हंगामात मुंबईने शेवटचा सामना खेळला होता. या कारणास्तव, हार्दिकची बंदी आता आयपीएल 2025च्या पहिल्या सामन्यातही कायम राहील.
पंड्याने आतापर्यंत 137 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 2525 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 10 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, तो 64 विकेट्स घेण्यातही यशस्वी झाला आहे. आता आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. तो भारतीय टी-20 संघाचा कर्णधार देखील आहे आणि त्याच्याकडे अनुभव आहे जो मुंबईसाठी उपयुक्त ठरू शकतो.