Dhoni vs Rohit Sharma : वानखेडेवर रंगणार महामुकाबला! धोनी आणि रोहितच्या पुनरागमनाने MI-CSK लढतीचा उत्साह शिगेला

या हंगामात धोनीने नेट्समध्ये इतका वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ
Dhoni vs Rohit Sharma : वानखेडेवर रंगणार महामुकाबला! धोनी आणि रोहितच्या पुनरागमनाने MI-CSK लढतीचा उत्साह शिगेला
Published on
Updated on

Dhoni vs Rohit Sharma Mumbai Indians vs Chennai Super Kings ipl 2026

मुंबई : आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात मोठा आणि बहुप्रतीक्षित थरार आज मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर अनुभवायला मिळणार आहे. क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आज, गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ७:३० वाजता आमनेसामने येतील. या सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि 'कॅप्टन कूल' एमएस धोनी यांचे मैदानावर होणारे संभाव्य पुनरागमन. या दोन महान खेळाडूंच्या उपस्थितीमुळे आजच्या सामन्यात टशन पाहायला मिळणार आहे.

धोनीच्या पुनरागमनाचे संकेत; सराव सत्रात गाळला घाम

चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, मात्र चाहत्यांचा लाडका खेळाडू एमएस धोनी अद्याप एकाही सामन्यात मैदानात उतरलेला नाही. मात्र, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. सीएसकेच्या ताज्या सराव सत्रात धोनीने फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणाचाही कसून सराव केला आहे. या हंगामात धोनीने नेट्समध्ये इतका वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ असून, तो मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे. सामन्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीचा अंतिम आढावा घेतला जाईल आणि नाणेफेकीच्या वेळी त्याच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब होईल.

रोहित शर्माच्या समावेशाकडे मुंबईचे लक्ष

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ रोहित शर्मा दुखापतीमुळे (हॅमस्ट्रिंग) गेल्या दोन सामन्यांना मुकला होता. रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईची फलंदाजी काहीशी कमकुवत भासत आहे. पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी या हंगामातील वाटचाल आव्हानात्मक ठरली असून, आजच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहितचे संघात असणे अनिवार्य मानले जात आहे. रोहित आता दुखापतीतून सावरला असून त्याने सराव सुरू केला आहे. तथापि, संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही घाई किंवा जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. जर रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असेल, तर तो नक्कीच अंतिम अकरामध्ये दिसेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा/दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स/शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, ए.एम. गझनफर, कृष भगत, जसप्रीत बुमराह, अश्विनी कुमार.

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, मॅथ्यू शॉर्ट/एमएस धोनी, जेमी ओव्हरटन, अंशुल कंबोज, नूर अहमद, मुकेश चौधरी/मॅट हेन्री/अकील हुसेन, गुरजपनीत सिंग.

आयपीएलमधील या 'एल क्लासिको' लढतीत रोहित आणि धोनी हे दोन्ही दिग्गज एकत्र मैदानात उतरल्यास चाहत्यांसाठी ती एक मोठी पर्वणी ठरेल. वानखेडेच्या मैदानावर विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news