Vaibhav Suryavanshi Touches MS Dhoni Feet IPL 2025 |
दिल्ली : राजस्थान रॉयल्सने मंगळवारी आयपीएल २०२५ च्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. सामन्यानंतर अरुण जेटली स्टेडियमवर वैभव सूर्यवंशी आणि एमएस धोनी यांच्यात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. सुर्यवंशीने धोनीचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या पायांना स्पर्श केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर असे क्षण अनेकदा दिसतात जे खेळापेक्षाही मोठे असतात. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात असाच एक हृदयस्पर्शी क्षण आला, ज्याने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. या सामन्यात, आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू, वैभव सूर्यवंशी याने त्याचा आदर्श असलेल्या एमएस धोनीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. सामन्यानंतर, जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, तेव्हा वैभवने धोनीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यावेळी धोनी हसत हसत त्याला आशीर्वाद देत आणि त्याच्या खेळाचे कौतुक करताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'संस्कृती ही वयापेक्षा मोठी असते' अशा अनेक प्रतिक्रिया चाहते या व्हिडिओला देत आहेत.
मंगळवारी राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जवर ६ विकेट्सने विजय मिळवला. लीगच्या या हंगामात त्यांचा प्रवास चांगला नव्हता. चेन्नई १४ सामन्यांमध्ये फक्त ४ विजय मिळवले आणि १० पराभवांसह ९व्या स्थानावर राहिली. राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या हंगामात तुफान फटकेबाजी करत आहेत. त्याने फक्त ७ सामन्यांमध्ये आपली ताकद दाखवून दिली. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या या सामन्यात १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्ससाठी ३३ चेंडूत ५७ धावांची शानदार खेळी केली. मुळचा बिहारचा असलेला डावखुरा फलंदाज सूर्यवंशी याने आपल्या खेळीदरम्यान ४ चौकार आणि ४ षटकार मारले आणि राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतरही वैभवने एमएस धोनीच्या पायांना स्पर्श करून घेतलेल्या आशीर्वादाने लोकांची मने जिंकली.