

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni IPL 2025 : चेन्नई सुपरकिंग्ससाठी यंदाचा IPL हंगाम आतापर्यंत काही खास गेलेला नाही. एमएस धोनीच्या संघाला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग पाच पराभवांना सामना करावा लागला. बालेकिल्ला मानल्या जाणा-या चेपॉक स्टेडियमवर तर CSKने पराभवाच्या हॅट्ट्रीकची लाजिरवाणी नोंद केली. या मैदानावर कोणत्याही संघाला चेन्नईला हरवणे सोपे नव्हते, पण यंदा हा किल्लाही ढासळला आहे.
पण असे CSK सोबत पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधी 2010 च्या हंगामातही एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईची टीम अशाच कठीण परिस्थितीतून गेली होती. पण त्यावेळी संघाने संघर्षमय कमबॅक केले आणि स्पर्धेच्या शेवटी चक्क ट्रॉफीवरच मोहोर उमटवली होती.
चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या IPL मधील आपला पहिला सामना जिंकला होता. पण त्यानंतर सलग पाच सामने गमावले. पहिले चार पराभव ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली झाले. तर पाचवा सामना गमावला तेव्हा संघाचा कर्णधार धोनी होता. पाचवेळच्या चॅम्पियन धोनीलाही पराभवाची मालिका खंडित करता आली नाही. अखेर सातव्या सामन्यात चेन्नईने एलएसजीवर मात केली आणि हंगामातील दुसरा विजय मिळवला. यापूर्वीही संघ अशाच परिस्थितीत अडकला होता.
2010 च्या आयपीएलमध्ये चेन्नई संघाने पहिल्या सात सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले. त्या हंगामात संघाने पहिला सामना गमावला होता, परंतु त्यानंतर संघाने सलग दोन सामने जिंकले होते. पण यानंतर सीएसकेचा सलग चार सामन्यांमध्ये पराभव झाला. पण जेव्हा साखळी टप्प्यातील 14 सामने संपले तेव्हा संघ सात सामने जिंकून 14 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यानंतर सीएसकेने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. अंतिम सामन्यात त्यांची लढत मुंबई इंडियन्सशी झाली. जिथे सीएसकेने एमआयला 22 धावांनी धूळ चारून विजेतेपद पटकावले.