

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) आधारस्तंभ एमएस धोनीच्या (MS Dhoni) दुखापतीमुळे संघाल मोठा धक्का बसला आहे. पायाच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे धोनी आता एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, धोनीच्या पुनरागमनासाठी आता एप्रिलचा शेवटचा आठवडा उजाडू शकतो, ज्यामुळे सीएसकेच्या आयपीएल २०२६ मोहिमेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सने धोनी केवळ दोन आठवडे विश्रांती घेईल, असे संकेत दिले होते. मात्र, ताज्या माहितीनुसार ही दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचे समोर आले आहे. जर धोनी एप्रिलअखेरपर्यंत उपलब्ध नसेल, तर तो हंगामातील सुरुवातीच्या किमान ६ सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
४४ वर्षीय धोनी गेल्या महिन्याभरापासून सराव सत्रात घाम गाळत होता, मात्र सरावादरम्यानच त्याच्या पायाचे स्नायू ताणले गेले. सध्या तो संघासोबत गुवाहाटीला न जाता चेन्नईमध्येच राहून उपचार घेत आहे. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या लढतीतही त्याच्या सहभागाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
धोनीच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई समोर केवळ एका अनुभवी खेळाडूची उणीव भासणार नाही, तर संघ रचनेतही मोठे बदल करावे लागणार आहेत. गेल्या काही हंगामांपासून धोनीची फलंदाजीतील भूमिका मर्यादित झाली होती, तरीही त्याचे मैदानातील अस्तित्व संघासाठी महत्त्वाचे होते. आता त्याच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन पार पाडणार असल्याचे समजते, तर मैदानातील नेतृत्वाचे ओझे प्रामुख्याने ऋतुराज गायकवाडला पेलावे लागणार आहे. यामध्ये त्याला प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि वरिष्ठ खेळाडूंचे सहकार्य लाभेल.
दोन आठवड्यांची किरकोळ दुखापत वाटणारी ही घटना आता लांबणीवर पडल्याने चेन्नई सुपर किंग्सला आपल्या सर्वात मोठ्या आयकॉनशिवाय मैदानात उतरण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या टप्प्यात धोनीची अनुपस्थिती संघाच्या कामगिरीवर काय परिणाम करते, याकडे आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.