

ICC Hall of Fame | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. लंडनमधील प्रतिष्ठित अॅबे रोड स्टुडिओमध्ये आयोजित एका शानदार समारंभात आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झालेल्या सात प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये माजी भारतीय कर्णधाराचा समावेश होता. या सन्मानानंतर महेंद्रसिंह धोनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झाल्यानंतर बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, "आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणे हा एक सन्मान आहे. पिढ्यानपिढ्या आणि जगभरातील क्रिकेटपटूंच्या योगदानाची दखल घेणारा हा सन्मान आहे. अशा सर्वकालीन महान खेळाडूंसोबत तुमचे नाव लक्षात ठेवणे ही एक अद्भुत भावना आहे. ही भावना मी कायम जपून ठेवेन."
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महेंद्रसिंह धोनीचे अभिनंदन केले आहे. बीसीसीआयने 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या प्रतिष्ठित यादीत समाविष्ट होणारा तो ११ वा भारतीय खेळाडू बनला आहे.
महेंद्रसिंह धोनीने टीम इंडियासाठी 98 टी-20 सामने खेळले आहेत. १२६.१३ च्या स्ट्राईक रेटने ३७.६० च्या सरासरीने १,६१७ धावा त्याच्या नावावर आहेत. दोन अर्धशतके त्याच्या नावावरअसून टी-20मधील त्याची सर्वोत्तम धावा ५६ आहेत. त्याने ९० कसोटी सामने खेळले असून ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमधील त्याने २२४ च्या सर्वोत्तम धावांसह सहा शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली आहे. कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो १४ वा खेळाडू आहे. धोनीने भारतासाठी ३५० एकदिवसीय सामने खेळले ज्यामध्ये त्याने १०७७३ धावा केल्या. यामध्ये १० शतके आणि ७३ अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. वन-डेमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८३ नाबाद होती. कर्णधार म्हणून, त्याने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी त्याने २७ सामने जिंकले, १८ सामने गमावले आणि १५ सामने अनिर्णित राहिले. ४५ टक्के विजयाच्या टक्केवारीसह महेंद्रसिंह धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
महेंद्रसिंह धोनी हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा देशातील अकरावा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विनू मांकड, डियान एडुलजी, वीरेंद्र सेहवाग, नीतू डेव्हिड यांना हा सन्मान देण्यात आला. गावस्कर आणि बिशनसिंग बेदी हे आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे भारतातील सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. २००९ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला होता.