

Indian cricketers run out record
दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पाच गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पुनरागमन करून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. क्रिकेटमध्ये खेळाडू अनेक प्रकारे बाद होतात, पण त्यात धावबाद होणे हा सर्वात दुर्दैवी प्रकार मानला जातो.
कधी खेळाडू स्वतःच्या चुकीमुळे, तर कधी दुसऱ्याच्या चुकीची किंमत मोजून धावबाद होतो. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ अशाप्रकारे बाद होणे टाळण्याचा प्रयत्न करेल. पण, आतापर्यंत क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद झालेल्या भारतीय खेळाडूंची नावे तुम्हाला माहीत आहेत का?
टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा धावबाद होण्याचा विक्रम भारतीय संघातील अशा तीन फलंदाजांच्या नावावर आहे, जे फिल्डिंगच्यावेळी सर्वात वेगवान मानले जातात. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. हे तिघेही प्रत्येकी सहा वेळा धावबाद झाले आहेत. कोहली आणि धोनीचे नाव यामध्ये असणे हे सर्वात आश्चर्यकारक आहे. कारण, हे दोघेही धावांमध्ये सर्वात वेगवान फलंदाज मानले जातात.
भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा धावबाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांचा समावेश आहे. द्रविड सर्वाधिक वेळा म्हणजे ४० वेळा धावबाद झाला आहे, तर सचिन ३४ वेळा धावबाद झाला आहे. या दोघांनी अनेक वर्षे भारताच्या अव्वल आणि मधल्या फळीची जबाबदारी सांभाळली. अझरुद्दीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२ वेळा धावबाद झाला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा धावबाद होण्याचा विक्रमही द्रविडच्या नावावर आहे. तो या प्रकारात १३ वेळा धावबाद झाला आहे. तर, चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकर संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हे दोघेही प्रत्येकी नऊ वेळा धावबाद झाले आहेत. पुजारा आता कसोटी संघाचा भाग नाही.