पुढारी ऑनलाईन डेस्क : Morne Morkel Team India Bowling Coach : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मॉर्नी मॉर्केल याची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून त्याचा कार्यकाळ सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय संघाला 19 सप्टेंबरपासून बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत मॉर्केल याची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच मालिका असणार आहे.
गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गोलंदाजी प्रशिक्षकाचा शोध सुरू होता आणि याच क्रमाने जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज गोलंदाजांची नावे पुढे आली होती, पण आता क्रिकबझच्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल याची भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी क्रिकबझला मॉर्केलच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे मॉर्कल नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात सामील होऊ शकला नाही, परंतु आता बांगलादेशविरुद्धच्या आगामी मायदेशातील मालिकेपासून तो गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉर्केल 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होता, परंतु करार संपण्याच्या काही महिन्यांपूर्वी त्याने पद सोडले. याआधी तो ऑस्ट्रेलियात 2022 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान नामिबियाच्या कोचिंग स्टाफसोबत होता. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये डर्बन सुपर जायंट्सचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या महिला टी-20 विश्वचषकादरम्यान त्याने न्यूझीलंडच्या संघासोबतही काम केले.
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मॉर्केल यांच्यात चांगले संबंध आहेत. वृत्तानुसार, गंभीरने मॉर्केलला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची शिफारस बीसीसीआयकडे केली होती. मॉर्केल आणि गंभीर यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघात एकत्र काम केले आहे. गंभीर हा त्या संघाचा मार्गदर्शक होता तर मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता.
मॉर्केलने 86 कसोटीत 27.66 च्या सरासरीने 309 विकेट घेतल्या. दरम्यान, 23 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. त्याने 8 वेळा 5 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 117 सामन्यात 25.32 च्या सरासरीने 188 विकेट घेतल्या. त्याने 44 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले असून 25.34 च्या सरासरीने 47 बळी घेतले आहेत.