कोलकाता, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या तंदुरुस्तीबाबत एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. शमीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कुबड्यांच्या सहाय्याने उभा असल्याचे दिसत आहे. 'आयपीएल 2024' मध्येही तो दुखापतीमुळे खेळत नाही. परंतु, आता लवकरच मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानात परणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळू शकला नव्हता. यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकांनाही मुकला. शमी गेल्या आयपीएल टी-20 स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्यासोबतच वन-डे वर्ल्डकपमध्येही त्याने सर्वाधिक बळी टिपले होते; पण सध्या तो दुखापतग्रस्त असून, त्याच्या रिकव्हरीची त्यानेच अपडेट दिली आहे.
त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, तो हळूहळू पुनरागमनाच्या जवळ पोहोचत आहे आणि पुन्हा एकदा यशाला गवसणी घालण्यास सज्ज आहे. यापुढचा मार्ग कठीण असू शकतो; पण तो प्रवास गरजेचा आहे. कारण, त्यातून मिळणारा निकाल सर्वोत्तम असेल.