Mohammed Shami Haseen Jahan
नवी दिल्ली: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि वादग्रस्त ठरलेल्या विवाहाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. एका मुलाखतीत त्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले. कोणावरही आरोप करण्याऐवजी फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्याने म्हटले आहे. 'माझी ओळख केवळ माझ्या खेळामुळे व्हावी, वैयक्तिक वादामुळे नाही,' असंही तो म्हणाला.
शमीने स्पष्ट सांगितले की, "जे घडून गेले, ते मागे सोडा. मला भूतकाळाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. मला कोणालाही दोष द्यायचा नाही, ना स्वतःला ना दुसऱ्या कोणाला." या वक्तव्यातून त्याने आता आपले संपूर्ण लक्ष केवळ क्रिकेटवर केंद्रित असल्याचे आणि वादांपासून दूर राहू इच्छित असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचे लग्न २०१४ मध्ये झाले होते, परंतु २०१८ मध्ये त्यांच्या नात्यात कटुता आली. हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर शारीरिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. नुकतेच कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला पत्नी आणि मुलीच्या पालनपोषणासाठी दरमहा एकूण चार लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये १.५ लाख रुपये पत्नीला आणि २.५ लाख रुपये मुलीला देण्याचे निर्देश आहेत. तसेच, ट्रायल कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी सहा महिन्यांच्या आत पूर्ण करावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
शमीने इतर क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली. जेव्हा त्याला शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांच्या वैवाहिक वादांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, "या गोष्टींचा शोध घेणे हे तुमचे काम आहे. आम्हाला फासावर का लटकवू इच्छिता? दुसऱ्या बाजूनेही पाहा. मी फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करतो, वादांवर नाही." या प्रतिक्रियेतून शमीला आपल्या कारकिर्दीला वैयक्तिक आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व मिळावे, असे वाटते हे स्पष्ट होते.
शमी हळूहळू मैदानावर पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळताना उत्तर विभागाविरुद्ध १७ षटकांत ५५ धावा देत एक बळी मिळवला. तथापि, आयपीएल २०२४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्याला नऊ सामन्यांत केवळ सहा बळी घेता आले. याच खराब कामगिरीमुळे त्याला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी आणि आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातील वाद मागे सारून मैदानावर आपली लय परत मिळवण्याचे मोठे आव्हान सध्या शमीपुढे आहे.