
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. या सामन्यात त्याने तिसरी विकेट घेऊन एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 200 वा बळी घेण्याचा पराक्रम केला. या बाबतीत त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले.
दुबईमध्ये बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या या सामन्यापूर्वी, शमीला 200 विकेट्स पूर्ण करण्यासाठी 3 विकेट्सची आवश्यकता होती. 12 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी सामना खेळणाऱ्या शमीने निराश केले नाही आणि पहिल्याच षटकात विकेट घेऊन या विक्रमाकडे वाटचाल केली. मग त्याच्या चौथ्या षटकातही शमीने चमत्कार केला. यासह त्याने बांगलादेशचा तिसरा आणि त्याचा दुसरा बळी मिळवला.
त्यानंतर काही वेळानंतर, शमीने झाकीर अलीला बाद करून 154 धावांची मोठी भागीदारीच मोडली. तसेच 200 बळीही पूर्ण केले. 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शमीने त्याच्या 104 व्या सामन्यात 200 विकेट्सचा टप्पा गाठला. यासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा गोलंदाज बनला. शमीने 5126 चेंडूत ही कामगिरी करून विश्वविक्रम नोंदवला. यापूर्वी ही कामगिरी ऑस्ट्रेलियन दिग्गज मिचेल स्टार्क (5240 चेंडू) यांच्या नावावर होती.
मोहम्मद शमी : 5126
मिचेल स्टार्क : 5240
सकलेन मुश्ताक : 5451
ब्रेट ली : 5640
ट्रेंट बोल्ट : 5783
बांगलादेशविरुद्ध पहिला बळी घेताच शमीने आशियातील 100 बळी पूर्ण केले. त्याने अवघ्या 53 डावात ही कामगिरी पूर्ण केली. आशियानंतर, त्याने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (ओशनिया) मध्ये एकूण 49 विकेट्स घेतल्या आहेत. युरोपमध्ये खेळताना या भारतीय वेगवान गोलंदाजाने 26 आणि आफ्रिकेत 15 विकेट्स घेतल्या आहेत.
102 सामने : मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
104 सामने : मोहम्मद शमी (भारत)
104 सामने : सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)
107 : ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)
112 : ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया)
117 : अॅलन डोनाल्ड (द. आफ्रिका)