

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा अवघ्या सहा दिवसांत गाशा गुंडाळाला. न्यूझीलंड आणि भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ सुरू झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीला नवीन विजेता मिळण्यापूर्वी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझालंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची मंगळवारी (दि. 4) घोषणा केली. मोहम्मद रिझवानची टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करत बाबर आझमसह त्याची संघातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच टी-20 आंतरराष्ट्रीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांचा संघ जाहीर केला. पीसीबीने सलमान अली आगा याच्याकडे टी-20 संघाचे नेतृत्व दिले आहे. तर शादाब खानची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. बाबर आणि रिझवान यांना टी-20 संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सलमानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली होती.
मोहम्मद हरिस बऱ्याच काळानंतर संघात परतला आहे तर साईम अयुब दक्षिण आफ्रिकेत झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 22 वर्षीय यष्टिरक्षक हसन नवाज, ज्याने फक्त 21 टी-20 सामने खेळले आहेत आणि अद्याप पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळलेला नाही, त्यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 27 वर्षीय फलंदाज अब्दुल समदला देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर संधी मिळाली आहे. फलंदाज ओमैर युसूफ देखील संघाचा भाग आहे.
गोलंदाजी विभागात काही बदल करण्यात आले आहेत. नसीम शाह संघातून अनुपस्थित आहे, परंतु शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफची जोडी खेळताना दिसेल. फिरकीपटू सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे, तर खुशदिल शाहचा संघात समावेश करण्यात आला आहे.
रिझवानला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर सलमान अली आगाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संघात बाबर आझमचा समावेश आहे, पण शाहीन शाह आफ्रिदीला डच्चू देण्यात आला आहे. सॅम अयुब आणि फखर जमान यांचे पुनरागमन लांबले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 16 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ख्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल. मालिकेतील दुसरा सामना 18 मार्च, तिसरा सामना 21 मार्च, चौथा सामना 23 मार्च आणि शेवटचा पाचवा सामना 26 मार्च रोजी खेळला जाईल. एकदिवसीय मालिका 29 मार्चपासून सुरू होईल. पहिला सामना नेपियरमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 2 एप्रिल रोजी खेळला जाईल आणि मालिकेचा शेवट 5 मार्च रोजी होणार आहे.
सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, हारिस रौफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मोहम्मद इरफान खान, ओमैर बिन युसूफ, शाहीन शाह आफ्रिदी, सुफयान मोकीम.
मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अब्रार अहमद, आकिफ जावेद, बाबर आझम, फहीम अश्रफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफियान मोकीम, तैयब ताहिर.