

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटमध्ये (indian cricket) सध्या तरुण खेळाडूंची भरभराट आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी या उदयोन्मुख खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतरही खेळाडूंना बराच काळ वाट पहावी लागते. भारतीय क्रिकेटमधील प्रतिभेचे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (mitchell starc) कौतुक केले आहे. तो म्हणाला की, ‘हा एकमेव देश आहे जिथे एकाच दिवशी तीन वेगवेगळे संघ वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळू शकतात.’
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकून, भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. ऑस्ट्रेलियापासून न्यूझीलंडपर्यंत कोणताही संघ टीम इंडियाला (team india) हरवू शकला नाही.
अलिकडेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करताना एक मोठी गोष्ट सांगितली आहे. तो म्हणतो की, भारताकडे सध्या असे 3 संघ तयार करण्याची ताकद आहे, जे एकाच दिवशी वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळू शकतात.
मिशेल स्टार्कचे म्हणाला, ‘मला वाटतं भारत हा एकमेव असा देश आहे जे एकाच दिवशी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, वनडेत इंग्लंडविरुद्ध आणि टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असे तीन वेगवेगळे संघ मैदानात उतरवू शकतात. हे तिन्ही संघ टक्कर देणारे असतील. हे फक्त भारतच करू शकतो. ते दुसऱ्या कोणत्याही संघाला जमणार नाही.’
आयपीएलबद्दल विचारले असता स्टार्क म्हणाला, ‘मला माहित नाही की याचा फायदा आहे की नाही, पण भारतीय खेळाडू सोडून इतर सर्व देशांतील खेळाडू फ्रँचायझी क्रिकेट खेळू शकतात. भारतीय खेळाडू फक्त आयपीएल खेळू शकतात. आयपीएल ही खूप मोठी स्पर्धा आहे. यामुळे भारतात नवीन खेळाडूंना संधी मिळते.’
30 वर्षीय स्टार्क इंडियन प्रीमियर लीगच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. दिल्लीने त्याला मेगा लिलावात 11.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तो गेल्या हंगामातील विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता.
टीम इंडियाचे दबदबा जगभर प्रस्थापित झाला आहे. गेल्या 9 महिन्यांत, या संघाने दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. पहिला जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे खेळली गेलेली टी-20 विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. त्यानंतर अलीकडेच या टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
2023 च्या विश्वचषकात भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. पण जेतेपदाच्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण यानंतर भारतीय संघ दोन आयसीसी स्पर्धांमध्ये अपराजित राहिला आणि दोन्ही स्पर्धांच्या चषकावर नाव कोरले.
यावरून टीम इंडियाचे वर्चस्व दिसून येते. विरोधी संघालाही भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करावे लागले आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाचा घातक वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या संघाचे खूप कौतुक केले.