MI vs KKR IPL 2026 : केकेआरसाठी ‌‘करो या मरो‌’चा सामना, साखळी फेरीत आज मुंबई इंडियन्सचे आव्हान

MI vs KKR IPL 2026
Published on
Updated on

कोलकाता : आपले आव्हान कसेबसे जिवंत ठेवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासमोर ‌‘आयपीएल‌’मधील आगेकूच कायम ठेवण्यासाठी आज (दि. 20) अव्वल फेरीतून आधीच बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सचे आव्हान परतावून लावणे क्रमप्राप्त असणार आहे. या लढतीत पराभव पत्करला, तर मात्र केकेआरचे हंगामातील आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे त्यांना येथे सर्व आघाड्यांवर दक्ष राहावे लागेल.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली 2024 मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर, 2025 च्या हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ‌‘केकेआर‌’ला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या हंगामातही पराभव झाल्यास रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ सलग दुसऱ्यांदा बाद फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरेल.

मात्र, बुधवारी विजय मिळवूनही रहाणेच्या संघाचा मार्ग सुकर नसेल; कारण केकेआरचे भवितव्य शनिवारी लखनौ सुपर जायंटस्‌‍विरुद्ध होणाऱ्या पंजाब किंग्जच्या सामन्यावर अवलंबून असेल. जर पंजाबने तो सामना जिंकला, तर रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणारा केकेआरचा अंतिम साखळी सामना केवळ डेड रबर ठरेल.

सध्याच्या गुणतालिकेचा विचार केला, तर गतविजेता आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी यापूर्वीच प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंटस्‌‍ आणि मुंबई इंडियन्स शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

त्यामुळे आता प्लेऑफच्या एकमेव शिल्लक जागेसाठी पंजाब किंग्ज (13 गुण), राजस्थान रॉयल्स (12 गुण), चेन्नई सुपर किंग्ज (12 गुण), दिल्ली कॅपिटल्स (12 गुण) आणि कोलकाता नाईट रायडर्स (11 गुण) अशा पाच संघांमध्ये चुरस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news