

Lionel Messi:
बयामोन: फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा मैदानात सुरक्षा भेदून आलेल्या चाहत्याच्या अतरंगी वागण्याचा शिकार ठरला. गुरुवारी 'इंटर मियामी' आणि 'इंडिपेंडिएन्टे डेल वैले' यांच्यात झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान एका चाहत्याने मेस्सीला मागून पकडल्यामुळे तो जमिनीवर कोसळला. सुदैवाने, या घटनेत मेस्सीला कोणतीही दुखापत झालेली नाही.
बयामोन येथील जुआन रॅमन लोब्रिएल स्टेडियमवर हा सामना रंगला होता. सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला एका चाहत्याने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत मैदानात धाव घेतली. त्याने थेट मेस्सीपाशी जाऊन त्याच्या कमरेत घट्ट पकडले. यावेळी मेस्सीचे लक्ष नव्हते. तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तत्काळ त्या चाहत्याला ओढून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ओढाओढीत मेस्सी आणि तो चाहता दोघेही जमिनीवर कोसळले.
मेस्सी लगेच उठून उभा राहिला आणि मैदानाच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. संबंधित चाहत्याला मेस्सीसोबत 'सेल्फी' घेण्याची इच्छा होती, मात्र सुरक्षा रक्षकांच्या हस्तक्षेपामुळे त्याची ही संधी हुकली. या प्रदर्शनीय सामन्यादरम्यान अनेक चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
या मैत्रीपूर्ण सामन्यात इंटर मियामीने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मियामीकडून सँटियागो मोरालेसने १६ व्या आणि लिओनेल मेस्सीने ७० व्या मिनिटाला गोल केले. विशेष म्हणजे, पायाच्या दुखापतीमुळे १३ फेब्रुवारीला होणारा हा सामना पुढे ढकलण्यात आला होता, ज्यामध्ये मेस्सीने आता दमदार पुनरागमन केले आहे.