

साऊथम्प्टन; वृत्तसंस्था : क्रिकेटच्या पंढरीत, म्हणजेच इंग्लंडमध्ये शनिवारी क्रीडाप्रेमींना एक अजब घटना पहायला मिळाली. टीम इंडिया साऊथम्प्टनच्या रस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीत (ट्रॅफिक जाम) अडकली आणि या अभूतपूर्व गोंधळामुळे सामन्याची नाणेफेक (टॉस) ४५ मिनिटे उशिरा तर प्रत्यक्ष सामना ३० मिनिटे उशिराने सुरू करावा लागला. आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारतीय संघ वेळेत मैदानावर पोहोचू न शकल्याने क्रिकेट जगताने कपाळावर हात मारून घेतला.
उभय संघांतील येथील पाचव्या व शेवटच्या टी-२० लढतीसाठी इंग्लंडचा संघ मैदानावरील हॉटेलमध्येच मुक्कामी होता. मात्र, भारतीय संघ शहराच्या ‘ओशन व्हिलेज’ भागात थांबला होता. दुपारी २ वाजता टॉस होणे अपेक्षित होते, पण मैदानाकडे येणारा एकमेव रस्ता वाहनांनी पूर्णपणे पॅक होता. व्हीआयपी सुरक्षा असूनही भारतीय संघाची बस ट्रॅफिकमध्ये अडकून पडली. अखेर नियोजित वेळेच्या पाच मिनिटे नंतर, म्हणजे दुपारी २.०५ वाजता भारतीय खेळाडू मैदानावर पोहोचले. खेळाडूंना वॉर्म-अपसाठी वेळ मिळावा म्हणून टॉस दुपारी २.४५ पर्यंत आणि सामना ३ वाजता सुरू करण्याचा तातडीचा निर्णय घेण्यात आला.
इंग्लंडसारख्या विकसित देशात आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी अशी वाहतूक कोंडी होणे ही लाजिरवाणी बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये अशी घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी द ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिजचा संघही अशाच ट्रॅफिकमध्ये अडकला होता.