मँचेस्टर युनायटेड पुन्हा टॉप थ्रीमध्ये; चेल्सीला धक्का

मँचेस्टर युनायटेड पुन्हा टॉप थ्रीमध्ये; चेल्सीला धक्का
Published on
Updated on

लंडन, वृत्तसंस्था : मँचेस्टर युनायटेडच्या स्कॉट मॅकटॉमिनय व अँथोनी मार्शल यांनी प्रत्येकी 1 गोल करत आपल्या संघाला प्रीमियर लीगमध्ये इव्हर्टनविरुद्ध 2-0 असा सहज विजय संपादन करून दिला. या विजयासह मँचेस्टर युनायटेडचा संघ पुन्हा एकदा टॉप थ्रीमध्ये पोहोचला आहे.

इरिक टेन हॅगचा युनायटेडचा संघ 29 सामन्यांत 56 गुणांसह न्यू कॅसलपेक्षा 3 गुणांनी पुढे आहे. मात्र, न्यू कॅसलचा संघ आणखी एक सामना बाकी आहे. युनायटेडचा संघ टॉटनहम हॉटस्परपेक्षाही 6 गुणांनी पुढे आहे. इव्हर्टनचा संघ सध्या रिलेगेशन टाळण्यासाठी झगडत असून क्रमवारीत त्यांना सध्या 16 व्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. नॉटिंगहम फॉरेस्ट 17 व्या तर बाऊर्नमाऊथ 18 व्या स्थानी आहेत.

युनायटेडतर्फे 36 व्या मिनिटाला जेडॉन सँचोच्या अप्रतिम पासवर स्कॉटने गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला. ब्रुनो फर्नांडिसने ही आघाडी 67 व्या मिनिटाला जवळपास डबल केलीच होती. पण, पिकफोर्डने हा जबरदस्त हल्ला क्रॉसबारवरून बाहेर पिटाळून लावला. नंतर मार्कस रॅशफोर्डच्या पासवर मार्शलने 71 व्या मिनिटाला युनायटेडचा दुसरा गोल केला. युनायटेडचा संघ येथे कॅसेमिरोशिवाय खेळत होता. मात्र, सहकारी मिडफिल्डर ख्रिस्तियन एरिक्सन गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत संघाात परतला. त्याच्यासाठी 28 जानेवारीनंतरचा हा पहिलाच सामना ठरला.

हॉटस्परच्या विजयात हॅरी केनचा लेट विनर

टॉटनहॅम हॉटस्परने घरच्या मैदानावर ब्रिटॉनला 2-1 अशा फरकाने विजय मिळवला, त्यावेळी हॅरी केनचा लेट विनर गोल निर्णायक ठरला. या सामन्यात सन हेउंग मिनचा सुपर्ब कर्लर गोल हॉटस्परला आघाडी मिळवून देऊन गेला. मात्र, 34 व्या मिनिटाला लुईस डंकने ब्रिटॉनला बरोबरीचा गोल करवून दिला. त्यानंतर हॅरी केनने 79 व्या मिनिटाला हॉटस्परचा विजयी गोल करेतोवर उभय संघात बरोबरीची कोंडी कायम होती. या निकालामुळे ब्रिटॉनचा संघ 46 गुणांसह सातव्या स्थानी फेकला गेला आहे.

टॉटनहम संघाला बहरात नसलेल्या साऊथहम्प्टन व इव्हर्टनविरुद्ध बरोबरी पत्करणे महाग पडत आले आहे. मात्र, सन व केन या दिग्गजांनी आपला संघ पहिल्या चारमध्ये राहील, यासाठी हरसंभव प्रयत्न केले आहेत.
फ्रँक लॅम्पार्डच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवाने

चेल्सी संघाचे अंतरिम प्रशिक्षक फ्रँक लॅम्पार्ड यांच्या दुसर्‍या इनिंगची सुरुवात पराभवाने झाली. चेल्सीला शनिवारी व्होल्वरहॅम्प्टन वाँडरर्सने 1-0 अशा फरकाने पराभूत केले. मॅथ्यूस न्यूनेसने 31 व्या मिनिटाला गोल केला. हाच गोल निर्णायक ठरला. चेल्सीचा संघ अद्यापही दुखापतग्रस्त मॅसॉन माऊंटशिवाय खेळत आहे. प्रीमियर लीगमधील अन्य सामन्यांत न्यू कॅसलने ब्रेन्टफोर्डवर 2-1 तर अ‍ॅस्टॉन व्हिलाने नॉटिंगहम फॉरेस्टवर 2-0 असा विजय मिळवला.

लिसेस्टरला बाऊर्नमाऊथविरुद्ध 0-1 पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लिश मिडफिल्डर जेम्स मॅडिसनच्या टेरिबल बॅकपासचा लाभ घेत फिलीप बिलिंगने 40 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. अन्य सामन्यांत वेस्ट हॅम युनायटेडला फुलहॅमच्या स्वयंगोलामुळे 3 महत्त्वपूर्ण गुणांची कमाई करता आली. जेरॉड बोवेनकडून यावेळी स्वयंगोल झाला. वेस्ट हॅमचा संघ न्यू कॅसल युनायटेडविरुद्ध 1-5 अशा फरकाने घरच्या मैदानावर पराभूत झाला असल्याने दडपणाखाली होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news