

क्वालालंपूर : स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपानच्या टोमोका मियाझाकीचा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या सिंधूने आठव्या मानांकित मियाझाकीचा केवळ 33 मिनिटांत 21-8, 21-13 असा सहज पराभव केला. शिवाय, पुरुष दुहेरीत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. मात्र, पुरुष एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.
महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती सिंधू आता उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित जपानी खेळाडू अकाने यामागुचीशी दोन हात करेल. यादरम्यान, भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यांनी मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप जोडीवर 21-18, 21-12 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या या भारतीय जोडीने मलेशियाच्या जोडीविरुद्ध आपले 4-0 असे सरस रेकॉर्ड कायम ठेवले आहे. आता पुढील फेरीत त्यांचा सामना चिनी तैपेईच्या चेन झी रे-लिन यू चिह आणि सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या फजर अल्फियान-फिकरी मुहम्मद यांच्यातील विजेत्याशी होईल.
भारताच्या पुरुष एकेरीतील खेळाडूंची मात्र निराशा झाली. लक्ष्य सेन आणि युवा आयुष शेट्टी या दोघांनाही उपउपांत्यपूर्व फेरीत (प्री-क्वार्टर फायनल) पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्य सेनला हाँगकाँगच्या ली च्युक यिउविरुद्ध 22-22, 15-21 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. आयुष शेट्टीने जागतिक अव्वल मानांकित शी यू क्यूविरुद्ध कडवी झुंज दिली. मात्र, त्याचे आव्हानही 18-21, 21-18, 12-12 अशा फरकाने संपुष्टात आले.