

लखनौ; वृत्तसंस्था : कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाला साजेसे निर्णायक शतक आणि यान्सेन-चहल यांच्या भेदक मार्याच्या बळावर पंजाब किंग्जने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस्चा 7 गडी व 2 षटकांचा खेळ बाकी राखत एकतर्फी धुव्वा उडवला आणि आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा-अपेक्षा शक्य तितक्या उंचावल्या. प्रारंभी, लखनौने 20 षटकांत 6 बाद 196 धावांपर्यंत मजल मारली असली तरी पंजाबने 18 षटकांतच 3 बाद 200 धावांसह एकतर्फी विजय नोंदवला.
विजयासाठी 197 धावांचा पाठलाग करताना प्रियांश आर्य शून्यावर बाद झाला असला तरी प्रभसिमरन सिंगने 39 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 69 तर श्रेयस अय्यरने 51 चेंडूंत 11 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 101 धावा फटकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. या जोडीने तिसर्या गड्यासाठी 140 धावांची निर्णायक भागीदारी साकारली. सुयंश शेडगे 9 धावांवर नाबाद राहिला. या विजयासह पंजाबने 15 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली.
प्रारंभी, जोश इंग्लिसने खेळलेल्या 72 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर लखनौने 6 बाद 196 अशी मजबूत धावसंख्या उभारली. स्पर्धेतून आधीच बाहेर पडलेल्या लखनौची एकवेळ 7 व्या षटकात 3 बाद 69 अशी घसरगुंडी झाली होती. मात्र, त्यानंतर इंग्लिस आणि ऋषभ पंत (26) यांनी चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा त्याचा आयपीएल कारकिर्दीतील सहावा सामना होता.
साखळी फेरीची आज सांगता...प्ले-ऑफमधील चौथा व शेवटचा संघही आजच ठरणार
आज दुपारच्या सामन्यात जर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला, तर पंजाब किंग्जचे आव्हान अधिकृतपणे संपुष्टात येईल. मात्र, जर मुंबईने राजस्थानला हरवले, तर कोलकाता नाईट रायडर्सला नेट रन रेटच्या जोरावर पंजाबला मागे टाकण्याची एक अंधूक संधी असेल. त्यासाठी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आधी फलंदाजी करताना 200 धावा करून त्यांना 77 धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा जर केकेआर धावांचा पाठलाग करत असेल, तर त्यांना 180 धावांचे लक्ष्य साधारण 12 ते 12.4 षटकांमध्येच गाठावे लागेल, पण जर असे घडले नाही आणि राजस्थान आधीच हरलेला असेल, तर मात्र पंजाब किंग्ज थेट बाद फेरीत (प्ले-ऑफ) प्रवेश करेल, असे समीकरण आहे.
सलग 6 पराभवांची शृंखला अखेर संपुष्टात
या निकालासह पंजाबने सलग 6 पराभवांची शृंखला अखेर संपुष्टात आणली. विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर श्रेयसने हवेत झेपावत केलेले सिलेब्रेशन या यशाचे महत्त्व अधोरेखित करणारे होते.