ऑलिंपिक क्रिकेट : पुरुष-महिला दोन्ही गटांत 6-6 संघांचा सहभाग, पाकिस्तान बाहेर?

LA Olympic 2028 Cricket : टीम इंडियाची स्थिती जाणून घ्या
Team India
Twitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : LA Olympic 2028 Cricket : 128 वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. दरम्यान, आयोजकांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. अगामी लॉस एंजेलिस येथे रंगणा-या क्रीडा महाकुंभमेळ्यासाठी क्रिकेटच्या संघांची, खेळाडूंची संख्या निश्चित करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने बुधवारी (9 एप्रिल) लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 साठीचा स्पर्धा कार्यक्रम मंजूर केला. आयोजकांनी स्पष्ट केले की, ‘पुरुष आणि महिला दोन्ही गटात प्रत्येकी 6-6 संघ सहभागी होतील. दोन्ही गटांसाठी 90-90 खेळाडूंच्या संख्येवर शिक्कामोर्तब झाला आहे. स्पर्धेतील प्रत्येक संघाला 15 खेळाडूंची निवड करण्याची परवानगी आहे. हे सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील ज्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसाठी संघ स्पर्धा करतील. सामने कुठे खेळवले जातील हे अद्याप निश्चित झालेले नाही.’

ऑलिंपिकमध्ये समाविष्ट झालेल्या पाच नवीन खेळांपैकी क्रिकेट हा एक आहे. दोन वर्षांपूर्वी, आयओसीने 2028 च्या एलए ऑलिंपिकमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली. मुंबईत झालेल्या 141 व्या आयओसीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

351 पदक स्पर्धा रंगणार

अगामी ऑलिंपिकमध्ये एकूण 351 पदक स्पर्धा रंगणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकपेक्षा यात 22 स्पर्धा अधिकच्या होणार आहेत. आयओसीने जाहीर केल्यानुसार, स्पर्धेत एकूण 10,500 खेळाडूंचा कोटा कायम ठेवण्यात आला आहे, परंतु पाच नव्या खेळांमध्ये एकूण 698 अतिरिक्त खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.

5 नवीन खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश

क्रिकेटला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया ऑगस्ट 2021 मध्ये सुरू झाली होती. तेव्हा आयसीसीने अधिकृतपणे यासाठी मोहीम राबवण्याचा आपला हेतू जाहीर केला होता. यानंतर ICC आणि LA28 आयोजक समिती यांच्यात एक संयुक्त प्रयत्न सुरू झाला, ज्याला ऑक्टोबर 2023 मध्ये यश आले. आणि क्रिकेटला पाच नव्या खेळांपैकी एक म्हणून अधिकृतपणे प्रस्तावित करण्यात आले. तत्कालीन BCCI सचिव म्हणून जय शाह यांनी 2028 मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट आणण्यासाठीच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. दोन वर्षांपूर्वी, आयओसीने 2028 च्या एलए ऑलिंपिकमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशसह क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली. मुंबईत झालेल्या 141 व्या आयओसीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.

ब्रिस्बेन ऑलिम्पिक 2032 मध्ये देखील क्रिकेटचा समावेश?

दरम्यान, जय शाह हे आता ICCचे अध्यक्ष असून आता ते 2032च्या ब्रिस्बेन ऑलिम्पिमध्ये देखील क्रिकेटचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी दीर्घकालीन रणनीती आखली असून त्यावर काम सुरू झाले आहे.

आयसीसीचे 12 नियमित सदस्य

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्या 12 नियमित आणि 94 सहयोगी सदस्य देश आहेत. नियमित सदस्य देशांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे. तथापि, 2028 च्या ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिका यात सहभागी होईल हे निश्चित मानले जाते, कारण त्यांना यजमान कोट्याचा लाभ मिळेल. याचा अर्थ असा की अमेरिकेव्यतिरिक्त, आणखी पाच संघ सहभागी होऊ शकतील आणि त्यांना पात्रता प्रक्रियेतून जावे लागेल.

पाकिस्तान बाहेर? द. आफ्रिकेबद्दल सस्पेन्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी टी-20 क्रमवारीतील टॉप 5 संघांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळेल. सध्या या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. तर यजमान म्हणून अमेरिका संघाला थेट प्रवेश मिळण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाला ऑलिम्पिकमध्ये खेळताना पहायला चाहते उत्सुक आहेत.

सध्या पाकिस्तानचा टी-20 संघ 7 व्या स्थानावर आहे. परिणामी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार पहायला मिळणार की नाही याची चिंता चाहत्यांना सतावत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही सहाव्या स्थानावर आहे. जर दोन्ही संघांनी त्यांचे रँकिंग सुधारले नाही तर ते ऑलिंपिकमध्ये खेळण्यास मुकतील. भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ओलिम्पिकमध्ये मेन इन ब्ल्यूचे खेळणे निश्चित मानले जात आहे.

क्रिकेटला मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये मिळू लागला मान

अलीकडच्या काळात क्रिकेटला मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा मान मिळू लागला आहे. 2022 मध्ये बर्मिंघॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेट प्रथमच समाविष्ट करण्यात आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदक जिंकले तर भारताने रौप्यपदकावर नाव कोरले.

एशियन गेम्समध्ये टीम इंडियाची गोल्डन कामगिरी

2023 मध्ये हाँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये, 14 पुरुष संघ आणि 9 महिला संघांनी भाग घेतला होता. या दोन्ही गटांमध्ये भारताने सुवर्णपदक मिळवून वर्चस्व गाजवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news