

Lionel Messi in Delhi: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू अन् वर्ल्डकप विजेता कर्णधार लिओनेल मेस्सी आज सकाळी १०.४५ वाजता दिल्लीत दाखल झाला आहे. दरम्यान मेस्सीचे स्वागत करण्यासाठी राजधानी सज्ज झाली आहे. यासाठी उत्त स्तरावर सुरक्षा बैठक देखील झाली आहे.
मेस्सीने लीला पॅलेस या हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. त्याच्यासाठी एक संपूर्ण मजला बूक करण्यात आला आहे. अर्जेंटिनाचा संघ या हॉटेलमधील प्रेसिडेंटल सूट्समध्ये राहणार आहे. या प्रेसिडेंटल सूट्सचे एका रात्रीचे भाडे हे ३.५ लाख ते ७ लाख रूपयांच्या दरम्यान आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल स्टाफला मेस्सीच्या वास्तव्याबाबतची कोणतीही माहिती लीक न करण्याच्या सक्त सूचना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
विमानतळ आणि हॉटेल यांच्यातील अंतर जवळपास ३० मिनिटांचे आहे. मात्र लीला पॅलेसचे वातावरण एकदम टाईट ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी भारतातील विविध भागात मेस्सीला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यामुळं दिल्लीतील हॉटेलला एका किल्ल्याचे स्वरूपच देण्यात आलं आहे. लीला हॉटेलचा परिसर उच्च सुरक्षा झोन म्हणून घेषित करण्यात आला आहे.
दरम्यान, कॉर्पोरेट आणि व्हीव्हीआयपी पाहुण्यांची मेस्सीसोबतची बंद दाराआडच्या भेटींचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार या बंद दाराआडच्या बैठकीसाठी कोट्यावधी रूपये खर्च करावे लागणार आहेत. काही कॉर्पोरेटमधील व्यक्तींनी मेस्सीला भेटण्यासाठी तब्बल १ कोटी रूपये खर्च केल्याची देखील माहिती आहे.
दरम्यान, मेस्सीच्या दिल्ली भेटीसाठी उच्च स्तरावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस देखील मेस्सीला भेटणार असल्याची माहिती आहे. तसेच काही खासदार आणि भारतीय क्रिडा विश्वातील मोजके स्टार हे देखील मेस्सीला भेटणार आहेत. यात ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा देखील समावेश असेल.