

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : फिफा विश्वचषक २०२६ आता आपल्या अत्यंत रोमांचक टप्प्यात पोहोचला असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘गोल्डन बूट’ पुरस्कारासाठीची शर्यत कमालीची रंगतदार झाली आहे. सध्याच्या पहिल्या १० खेळाडूंपैकी ७ खेळाडूंचे संघ अजूनही स्पर्धेत टिकून असल्याने ही स्पर्धा अधिकच चुरशीची झाली आहे. मोरोक्कोविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात गोल डागत फ्रान्सच्या किलियन एम्बापेने या स्पर्धेत ८ गोल आणि ३ असिस्टसह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.
फिफा विश्वचषकाच्या नियमांनुसार, जर दोन किंवा अधिक खेळाडूंचे गोल समान असतील, तर पुढील निकषांवर विजेता ठरवला जातो.
१. असिस्ट : गोल करण्यासाठी सहकाऱ्याला दिलेले पास.
२. मैदानातील वेळ : ज्या खेळाडूने कमीत कमी वेळ खेळून जास्त गोल केले आहेत, त्याला प्राधान्य दिले जाते.
क्रम खेळाडू (देश) गोल असिस्ट खेळलेली वेळ (मिनिटे)
१. किलियन एम्बापे (फ्रान्स) ८ ३ ५४४
२ लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) ८ १ ४६८
३ अर्लिंग हालँड (नॉर्वे) ७ ० ४१६
४ हॅरी केन (इंग्लंड) ६ १ ४८९
५ उस्मान डेम्बेले (फ्रान्स) ५ २ ४४७
६ इस्माईला सार (सेनेगल) ४ १ ४१९
७ मिकेल ओयारझाबाल (स्पेन) ४ १ ४३५
८ जुलियन क्विनोनेस (मेक्सिको) ४ १ ४४०
९ ज्युड बेलिंगहॅम (इंग्लंड) ४ १ ४४७
१० व्हिनिसियस जुनिअर (ब्राझील) ४ १ ५०५
फ्रान्सच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यामुळे एम्बापे आणि डेम्बेले यांना आपले स्थान अधिक मजबूत करण्याची संधी आहे, तर दुसरीकडे मेस्सी, हालँड आणि हॅरी केन यांचे उपांत्यपूर्व सामने अद्याप बाकी असल्याने ते एम्बापेला तगडे आव्हान देऊ शकतात.
विश्वचषक २०२६ च्या १९ जुलै रोजी न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी ‘फिफा’ने अचानक १,२०० अतिरिक्त ‘कॅटेगरी २’ तिकिटे उपलब्ध केली आहेत. या एका तिकिटाची किंमत तब्बल ७,३८० डॉलर्स (सुमारे ६.१५ लाख रुपये) आहे. याव्यतिरिक्त, ‘कॅटेगरी १’ आणि ‘हॉस्पिटॅलिटी' तिकिटे १९,९९५ ते ३४,५०० डॉलर्सच्या घरात विकली जात आहेत.