Asia Cup final : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडला दंड; पाकिस्तानलाही संथ षटकांचा फटका

kranti gaud fined icc asia cup final
Published on
Updated on

दुबई : दुबईत रविवारी पार पडलेल्या महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिच्यावर सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या दिशेने अपमानास्पद अथवा त्याला आक्रमक प्रत्युत्तर देण्यास प्रवृत्त करू शकेल अशी भाषा, कृती किंवा हावभाव करण्याशी संबंधित आयसीसीच्या नियमावलीतील कलम २.५ च्या लेव्हल १ मधील तरतुदींचा भंग केल्याचा ठपका क्रांतीवर ठेवण्यात आला आहे. आर्थिक दंडाव्यतिरिक्त तिच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडण्यात आला असून, गेल्या २४ महिन्यांतील तिचा हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

ही घटना श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच षटकात घडली. क्रांतीच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेची सलामीवीर इमेशा दुलानीने लॅप शॉट खेळत सुरेख चौकार लगावला. मात्र, तीन चेंडूंनंतर पुन्हा तोच फटका खेळण्याच्या प्रयत्नात दुलानी बाद झाली. या यशानंतर कमालीच्या आक्रमक झालेल्या क्रांतीने पॅव्हेलियनच्या दिशेने हातवारे करत दुलानीला डिवचण्याचा प्रयत्न केला. सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांनी प्रस्तावित केलेली ही शिक्षा क्रांतीने विनाअट मान्य केल्यामुळे या प्रकरणी कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्याची आवश्यकता भासली नाही.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात संथ गतीने षटके टाकल्याप्रकरणी (स्लो ओव्हर-रेट) पाकिस्तान महिला संघालाही सामना शुल्काच्या ५ टक्के दंड ठोठावण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने १३१ धावांचे आव्हान १८.४ षटकांत पूर्ण केले होते. मात्र, वेळेचा ताळमेळ लक्षात घेता पाकिस्तानचा संघ निर्धारित वेळेत एक षटक मागे असल्याचे स्पष्ट झाले. चौथ्या पंच रबाब अहसन यांनी हा आरोप निश्चित केल्यानंतर कर्णधार फातिमा सना हिने चूक मान्य करत दंड स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news