KKR vs MI | केकेआरचाही मुंबईला दे धक्का

आयपीएल साखळी सामन्यात 4 गडी राखून नमवले
KKR vs MI |
KKR vs MI | केकेआरचाही मुंबईला दे धक्का
Published on
Updated on

कोलकाता; वृत्तसंस्था : यंदाच्या हंगामात अतिशय खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध देखील नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात मुंबईला 20 षटकांत 8 बाद 147 अशा माफक धावसंख्येवर रोखल्यानंतर केकेआरने विजयाचे लक्ष्य 18.5 षटकांत 4 गडी राखून सहजरीत्या पार केले.

विजयासाठी 148 धावांचे आव्हान असताना केकेआरतर्फे मनीष पांडेने सर्वाधिक 45 तर रोव्हमन पॉवेलने 40 धावांचे योगदान दिले. कर्णधार अजिंक्य रहाणेने 21 धावा जोडल्या. आघाडी फळीतील अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असले तरी माफक लक्ष्य असल्याने केकेआरने विजयाची संधी अजिबात दवडली नाही.

केकेआरच्या गोलंदाजांचा भेदक मारा

येथील अत्यंत महत्त्वाच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्सच्या संथ परिस्थितीचा अचूक फायदा उठवला. त्यांनी शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला 8 बाद 147 धावांवर रोखले. सामन्यापूर्वी खेळपट्टी बराच वेळ झाकून ठेवण्यात आली होती. या खेळपट्टीवर ढगाळ वातावरणात कोलकाताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅमेरून ग्रीन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ दुबे यांनी सुरुवातीला प्रत्येकी दोन बळी घेतले. कॅमेरून ग्रीनने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याने अवघ्या चार चेंडूंच्या अंतरात रायन रिकेल्टन आणि नमन धीर यांना बाद करून मुंबईला मोठे झटके दिले.

पॉवर प्लेमध्येच मुंबईवर 4 प्रहार!

सामन्याच्या सुरुवातीलाच कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कॅमेरून ग्रीनने 3 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले, तर त्याला सौरभ दुबेने 34 धावांत 2 बळी मिळवून मोलाची साथ दिली. या दुहेरी मार्‍यामुळे पहिल्या 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सने अवघ्या 41 धावांत आपले 4 महत्त्वाचे फलंदाज गमावले होते.

काय असेल केकेआरसमोरचे समीकरण?

मागील 7 पैकी 6 सामने जिंकणारा केकेआरचा संघ 13 गुणांसह सहाव्या क्रमांकावर असून प्ले ऑफ गाठण्यासाठी त्यांना आपल्या शेवटच्या साखळी फेरीत दिल्ली कॅपिटल्सला नमवावे लागेल. तसेच, पंजाब व राजस्थान त्यांच्या शेवटच्या लढतीत पराभूत व्हावेत, अशी अपेक्षाही करावी लागेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news