

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारतात पोहोचला तेव्हा संघाचा आत्मविश्वास खालच्या पातळीवर होता. श्रीलंका दौऱ्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर केन विल्यमसनही पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत या संघासाठी विजय तर दूरच पण त्यांचा भारताविरुद्ध टीकाव लागणार नाही असेच तर्क लावण्यात आले. पण किवी संघाने यजमान टीम इंडियाचा 3-0 असा धुव्वा उडवून केवळ क्रिकेट विश्वात खळबळ माजवली नाही तर इतिहासही रचला.
टीम इंडिया गेली 12 वर्षे आणि 18 मालिका मायदेशात अपराजित राहली होती. हा विक्रम न्यूझीलंडने मोडला. या यशात उजव्या हाताचा फलंदाज विल यंगने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने तिन्ही कसोटीत उपयुक्त खेळी खेळल्या. तो प्लेअर ऑफ द सिरीज ठरला.
यंगने तीन कसोटीत 48.80 च्या सरासरीने 244 धावा केल्या. ऋषभ पंत (261) आणि रचिन रवींद्र (256) यांच्यानंतर या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पण त्याने मुंबईत 71 आणि 51 धावांची खेळी खेळून आपल्या संघाच्या विजयात सर्वात मोठा वाटा उचलला. या मालिकेपूर्वी यंगचे किवी संघातील स्थान निश्चित नव्हते. 2020 मध्ये पदार्पण केल्यापासून तो आतापर्यंत केवळ 19 कसोटी खेळू शकला आहे. विल्यमसन असता तर भारताविरुद्धच्या मालिकेतही त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली नसती.
भारतावरील विजयानंतर यंग म्हणतो की, भारताविरुद्ध खेळताना मोक्याच्या क्षणी मला चांगली खेळी करून छाप पाडता आली ही माझ्या करिअरला चालना देणारी गोष्ट आहे. गेली चार वर्षे मी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा खेळाडू आहे. पण माझे प्लेईंग इलेव्हनमधील स्थान पक्के नव्हते. प्लेईंग इलेव्हनमध्ये नसायचो तेव्हा मी मैदानातील खेळाडूंना पाणी पाजत असे. यंदा भारतीय दौ-यावर आमचा भवशाचा फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमुळे बाहेर पडला आणि त्याच्या जागेवर माझी वर्णी लागली. ही माझ्यासाठी एक उत्तम संधी होती, ज्याचे मी सोने केले. असे असले तरी मला केन किंवा इतर कोणाचीही जागा घ्यायची नाही. मला फक्त माझा खेळ खेळायचा आहे. पुणे आणि मुंबई येथील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारताविरुद्ध धावा करणे समाधानकारक आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.