

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर डेटिंग करत असल्याची बातमी समोर आली आहे. अनिरुद्ध हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहे. तो Why This Kolaveri या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले. त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले पण 34 वर्षीय या संगीतकाराच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, अनिरुद्धचे सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे. (Kavya Maran Anirudh Ravichander)
आयपीएल 2025 मधील सनरायझर्स हैदराबाद संघ आपल्या विस्फोटक अंदाजासाठी ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या इतिहासातील तीन सर्वात मोठ्या धावसंख्या उभारल्या आहेत. काव्या मारन ही सन ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कलानिधी मारन यांची लेक आहे. काव्या मारन सनरायझर्स हैदराबादच्या प्रत्येक सामन्याला उपस्थित असते. पण आता ती कोणाला डेट करत आहे, अशा चर्चा सुरू आहे.
काव्या मारनचे रिलेशनशिप स्टेटस काय आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तिचे नाव संगीतकार अनिरुद्ध रविचंदरशी जोडले जात आहे. सोशल मीडियावर अशी अफवा पसरली होती की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. पण अनिरुद्धच्या टीमने अशा बातम्यांचे खंडन केले आणि म्हटले की, तो आणि काव्या फक्त मित्र आहेत.
अनिरुद्धचे नाव अभिनेत्री कीर्ती सुरेशशीही जोडले गेले होते. गेल्या वर्षी 2024 मध्ये, सोशल मीडियावर चर्चा होती की, कीर्ती अनिरुद्धशी लग्न करणार आहे. मात्र, ही फक्त अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि कीर्तीने तिचा प्रियकर अँटनी थाथिलशी विवाह केला.
अनिरुद्ध रविचंदर हा ज्येष्ठ अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. 16 ऑक्टोबर 1990 रोजी जन्मलेला अनिरुद्ध पहिल्यांदा 'व्हाय दिस कोलावेरी दी' या गाण्याने लोकप्रिय झाला. अनिरुद्ध हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा संगीतकार आहे. त्याने कमल हासन, थलापती विजय, रजनीकांत या बड्या स्टारच्या चित्रपटांना संगीत दिले आहे.
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात संगीत देण्यासाठी अनिरुद्धने 10 कोटी रुपये घेतले होते. मानधनाच्या बाबतीत त्याने ए.आर. रहमान आणि प्रीतमला मागे टाकले आहे. वृत्तानुसार, रहमान एका चित्रपटासाठी 7-8 कोटी तर प्रीतम 5 कोटी रुपये घेतात.